Join us

मोदी सरकारचे मोठे पाऊल; Google ला टक्कर देण्यासाठी येणार ‘आत्मनिर्भर’ वेब ब्राउझर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 9:17 PM

Indian Browser Launch: डिजिटल जगात मोठी क्रांती घडवण्याच्या दिशेने भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Atmanirbhar Browser: स्मार्टफोन किंवा इंटरनेट वापरणारे सर्व युजर्स कुठल्या ना कुठल्या ब्राउझरचा वापर करतात. यातील सर्व ब्राउझर परदेशी कंपन्यांनी तयार केले आहेत. पण, आता भारताकडे स्वतःचे 'आत्मनिर्भर ब्राउझर' असणार आहे. केंद्र सरकार देशातील पहिले स्वसदेशी ब्राउझर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आत्मनिर्भर भारत योजनेच्या धर्तीवर हे काम सुरू आहे. 

हे 'आत्मनिर्भर ब्राउझर' गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज, ऑपेरा आणि इतर ब्राउझरला टक्कर देईल. वेब ब्राउझर तयार करण्यासाठी 3 कोटी रुपयांच्या निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय आणि त्यांच्या संबंधित विभागांकडून त्याचे निरीक्षण केले जाईल. 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे डिजिटल गोष्टींवर आमचे नियंत्रण असणे महत्त्वाचे आहे. सुरक्षेच्या बाबतीत परदेशी वेब ब्राउझरवर अवलंबून राहावे लागू नये, यामुळेच हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, सुमारे 850 मिलियन युजर्सच्या भारतातील इंटरनेट बाजारपेठेत Google Chrome 88.47 टक्के मार्केट शेअरसह आघाडीवर आहे. सफारी 5.22 टक्के, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट एज 2 टक्के, सॅमसंग इंटरनेट 1.5 टक्के, मोझीला फायरफॉक्स 1.28 टक्के आणि इतर ब्राउझर्स 1.53 टक्के आहे.

2024 च्या अखेरीस स्वदेशी वेब ब्राउझरचा विकास आणि लॉन्चिंग पूर्ण होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशांतर्गत स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेशन्सना आमंत्रित केले आहे. 

टॅग्स :नरेंद्र मोदीभारततंत्रज्ञानगुगलव्यवसायकेंद्र सरकार