काही महिन्यांपूर्वी युएईतील भारतीय अब्जाधीश बीआर शेट्टी यांचे नाव वाचले असेल. संयुक्त अरब अमिरातमध्ये कायदेशीर खटल्यांमध्ये अडकलेले तेथील सर्वात मोठ्या औषध कंपनीचे मालक बी आर शेट्टी कंगाल झाले आहेत. त्यांनी अब्जावधी रुपयांची फिनाब्लर पीएलसी कंपनी इस्त्रायल-युएई कंसोर्टियमला केवळ एक डॉलर म्हणजेच ७३.५२ रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे.
शेट्टींच्या कंपन्यांवर अब्जावधी डॉलरचे कर्ज आहे. याचबरोबर त्यांच्यावर घोटाळ्याची चौकशी लागली आहे. यामुळेच फिनाब्लर ७३ रुपयांत विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मुळचे भारतीय असलेल्या शेट्टी यांची अब्जावधीची संपत्ती आहे. मात्र, त्यांची कंपनी पाच अब्ज डॉलरच्या कर्जाखाली अडकली आहे. तर शेट्टी यांच्याविरोधात फसवणूक केल्याची चौकशीही सुरु आहे. यामुळे त्यांच्या कंपनीला शेअर बाजारामध्ये ब्लॉक करण्यात आले आहे.
एनएमसी हेल्थ आणि अमिरातीतल्या कंपन्यांविरोधात सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यामुळे शेट्टी काही महिन्यांपासून अमिरातमधून गायब झाले आहेत. त्यांच्या कंपन्यांविरोधात कमीतकमी पाच प्रकरणांवर चौकशी सुरु आहे.
फिनाब्लरने ग्लोबल फिनटेक इन्वेस्टमेंट्स होल्डिंग (जीएफआयएच) सोबत एक करार केल्याची घोषणा केली आहे. यानुसार फिनाब्लर आपली सर्व संपत्ती जीएफआयएचला विकणार आहे. इस्त्रायलच्या प्रिझ्म ग्रुपची जीएफआयएचही कंपनी आहे.
युएईमध्ये हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये गडगंज संपत्ती आणि नाव कमावणाऱे ७७ वर्षींय शेट्टी हो भारतीय आहेत. त्यांनी १९७० मध्ये एनएमसी हेल्थ कंपनी स्थापन केली होती. या कंपनीने एवढी प्रगती केली की ती २०१२ मध्ये लंडन स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोंद झाली. त्याआधी या कंपनीने अमिरातमध्ये पाय पसरले होते. शेट्टी यांनी केवळ ८ डॉलर घेऊन युएई गाठली होती. त्यांनी मेडिकल रिप्रेंझेटेटिव्ह म्हणून काम केले होते. त्यांनी १९८० मध्ये अमिरातच्या सर्वात जुन्या रेमिटेंस बिझनेस युएई एक्सचेंजची सुरुवात केली होती. यूएई एक्सचेंज, युकेची एक्सचेंज कंपनी ट्रॅव्हलेक्स आणि अन्य काही पेमेंट सोल्यूशन्स कंपन्यांनी शेट्टी यांच्या फिनब्लर या कंपनीसोबत काम केले आहे. यानंतर २०१८ मध्ये या कंपन्या सार्वजनिक करण्यात आल्या. शेट्टी यांनी हेल्थकेअर, फायनान्शिअलशिवाय हॉस्पिटॅलिटी, फूड अँड बेव्हरेजेस, रिअल इस्टेटमध्येही नशीब आजमावले होते.
एका अहवालाने रस्त्यावर आणले?
शेट्टी यांनी दुबईची प्रसिद्ध इमारत बुर्ज खलिफामध्ये दोन मजले घेतले होते. त्यांच्या एवढ्या अजस्त्र साम्राज्याला एका अहवालाने उद्ध्वस्त केले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मड्डी वॉटर रिसर्चचे संस्थापक आणि लेखक कारसन ब्लॉक यांनी त्यांच्या एका अहवालामध्ये एनएमसीची पोलखोल केली आणि संपत्त्यांचा खोटा आकडा देणे, संपत्या ढापण्याचा आरोप लावला होता.