नवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या परिणामांतून अर्थव्यवस्था आता सावरत आहे. त्यामुळे २०२२मध्ये भारतातील कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना सरासरी ८.६ टक्के वेतनवाढ देतील, असा अंदाज डेलॉइटने जारी केलेल्या ‘श्रमशक्ती व वेतनवाढ कल सर्वेक्षण-२०२१’मध्ये व्यक्त करण्यात आला आहे. ही अनुमानित वेतनवाढ २०१९च्या कोविडपूर्व काळातील वेतनवाढीशी सुसंगत आहे. सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, २०२१ मध्ये भारतीय कंपन्या सरासरी ८ टक्के वेतनवाढ देतील. २०२० मध्ये ती अवघी ४.४ टक्के होती. तसेच केवळ ६० टक्के कंपन्यांनीच वेतनवाढ दिली होती.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २५ टक्के कंपन्यांनी २०२२ मध्ये दोन अंकी वेतनवाढ अनुमानित केली आहे. या सर्वेक्षणात सात क्षेत्रे आणि २४ उपक्षेत्रांतील ४५० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी झाल्या. आयटी क्षेत्राकडून सर्वाधिक वेतनवाढ मिळण्याची अपेक्षा आहे. त्याखालोखाल आरोग्य विज्ञान क्षेत्रात वेतनवाढ मिळेल. रिटेल, आतिथ्य, रेस्टॉरन्ट्स, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात कमी वेतनवाढ मिळेल.