मुंबई : देशातील कोट्यवधी बेरोजगारांसाठी मोठी खुशखबर आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच एप्रिल ते जूनपर्यंत देशातील ३८ टक्के कंपन्या अनेक कर्मचाऱ्यांना नव्याने कामावर घेण्याची योजना तयार करीत आहेत. यामुळे बेरोजगारांनी संबंधित कंपनीला आवश्यक असणारे कौशल्य प्राप्त करावेत, असे मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आउटलूकच्या सर्वेक्षणात म्हटले आहे.सर्वेक्षणात हजारो जणांना सहभागी करून घेण्यात आले होते. अहवालानुसार, विविध क्षेत्रांतील कर्मचारी भरती उपक्रम गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत खूपच अधिक आहेत. मॅनपॉवर ग्रुपचे संदीप गुलाटी म्हणाले, देश महामारीच्या संकटातून बाहेर पडत असताना, जागतिक भू-राजकीय अस्थिरता आणि वाढती महागाई यासारखी नवीन आव्हाने आहेत. दरम्यान, माहिती तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधनांचा प्रमुख स्रोत म्हणून भारताचा विकास होत राहील. त्यामुळे नोकऱ्यांचे प्रमाण काही क्षेत्रांत वाढताना दिसेल.पगारातही वाढ होणार!एप्रिल-जून तिमाहीत, ५५% कर्मचाऱ्यांना पगार वाढण्याची अपेक्षा आहे. तर १७% कर्मचाऱ्यांना पगार कमी होईल असे वाटते. तर ३८% लोकांना पगारात कोणताही बदल होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.महिलांना संधी कमीचगुलाटी म्हणाले की, कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व कमी असणे हा अजूनही चिंतेचा विषय आहे. सर्वेक्षणानुसार, आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नोकऱ्यांची ५१ टक्के संधी आहे. रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स येथे ३८ टक्के तर शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य आणि सरकारी नोकरी येथे ३७ टक्के संधी आहेत.मोठ्या संस्थांमध्ये मोठी संधीअहवालात म्हटले आहे, की ज्या संस्थांमध्ये २५० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात तेथे रोजगाराची संधी ४५ टक्के आहे. ज्या संस्थांमध्ये ५०-२४९ कर्मचारी काम करतात तेथे ३५ टक्के संधी आहे. अहवालानुसार, येत्या तीन महिन्यांत जगात सर्वच ठिकाणी वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे, कारण गेल्या दोन वर्षांपासून कंपन्यांनी पगारवाढ दिलेली नाही. जगात सर्वांत जास्त संधी भारतात असून, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि चीनचा क्रमांक लागतो, असे अहवालात म्हटले आहे.
आता तयारीला लागा, नोकरभरती वाढणार, वेतन वाढीचीही शक्यता; सर्वेक्षणात माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 6:11 AM