Join us

Indian Currency : एकेकाळी ५००० आणि १०००० नोटाही होत्या चलनात, माहितीये याचा इतिहास?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 4:00 PM

२ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला.

२ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला. या नोटा बदलून घेण्यास अथवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आता यो नोटा रिझर्व्ह बँकेत आणि आपल्या बँकांच्या शाखांमध्ये बदलून मिळत आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या होत्या. त्यावेळीही नोटा बदलून घेण्यास वेळ दिला होता. यावेळी २ हजारांच्या नोटेच्या बाबतीत मात्र नोटा थेट बंद न करता ही नोट ३० सप्टेंबरपर्यंत चलनात कायम ठेवली आहे.

२ हजारांची नोटच आजवरची सर्वाधिक मूल्याची नोट होती असं वाटत असेल तुम्हाला तर तसं नाही. यापूर्वी भारतात ५००० आणि १०००० रुपयांच्या नोटा देखील होत्या. रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आलेली १०००० रुपयांची नोट ही सर्वाधिक मूल्याची नोट होती. रिझर्व्ह बँकेनं १९३८ मध्ये १०००० रुपयांच्या नोटेची छपाई केली होती. परंतु १९४६ मध्ये ती बंद करण्यात आली. परंतु १९५४ मध्ये ती पुन्हा सुरू झाली आणि १९७८ मध्ये बंद करण्यात आली.

रघुराम राजन काय म्हणालेले?

यापूर्वी देशात ५ हजार आणि १० हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. पण तो फेटाळण्यात आला. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी हा प्रस्ताव दिला होता. मात्र, तो स्वीकारण्यात आला नाही. सन २०१६ मध्ये नोटबंदी करण्यात आली. त्याचवेळी २ हजार रुपायांची नोट चलनात आणण्यात आली. मात्र, त्यापूर्वी १० हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. रघुराम राजन यांनी ५ हजार आणि १० हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची सूचना केली होती. देशातील वाढत्या महागाईमुळे १ हजार रुपयांच्या नोटेचे मूल्य कमी झाले आहे. अनियंत्रित महागाई आटोक्यात आणण्यासाठी राजन यांनी मोठ्या नोटा छापण्याची शिफारस केली होती.

शिफारस स्वीकारली नाही

आरबीआयने लोकलेखा समितीला दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर २०१४ मध्ये ५ हजार आणि १० हजार रुपयांच्या नोटा आणण्याबाबत सुचवले होते. त्यानंतर माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली म्हणाले होते की, सरकारने ५ हजार आणि १० हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची शिफारस स्वीकारली नाही. यानंतर सरकारने RBI ला २ हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याच्या निर्णयाची माहिती दिली.

 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकपैसा