Join us

Flipkart पर्यटन क्षेत्रातही उतरणार; क्लिअरट्रीपच्या खरेदीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 5:51 PM

flipkart cleartrip deal: फ्लिपकार्ट क्लिअरट्रिपचे १०० टक्के भागभांडवल अधिग्रहित करणार. या खरेदी व्यवहाराच्या किंमतीचा खुलासा अद्याप कंपनीने केलेला नाही. 

बंगळुरू : वॉलमार्टच्या मालकीची असलेल्या फ्लिपकार्टने (Flipkart) आज क्लिअरट्रिप (Clear Trip) या आघाडीच्या ऑनलाइन पर्यटन तंत्रज्ञान कंपनीच्या प्रस्तावित अधिग्रहणाची घोषणा केली. फ्लिपकार्ट क्लिअरट्रिपचे १०० टक्के भागभांडवल अधिग्रहित करत असून आपल्या ग्राहकांसाठीच्या डिजिटल कॉमर्स सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी कंपनी अधिकाधिक गुंतवणूक करत आहे. या खरेदी व्यवहाराच्या किंमतीचा खुलासा अद्याप कंपनीने केलेला नाही. (Indian e-commerce company, Flipkart announced that it will be acquiring Cleartrip, an online travel technology company. )

करारातील शर्तींनुसार क्लिअरट्रिपचे परिचलन फ्लिपकार्ट ताब्यात घेईल. क्लिअरट्रिप स्वतंत्र ब्रँड म्हणून कार्यरत राहील, सर्व कर्मचारीवर्गही कायम राहील आणि ग्राहकांसाठी प्रवास अधिक सोपा करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानात्मक सोल्युशन्स अधिक विकसित करण्यासाठी फ्लिपकार्टसमवेत काम करेल.

फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, “डिजिटल कॉमर्सच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वस्वी वेगळा अनुभव देण्यासाठी फ्लिपकार्ट कटिबद्ध आहे. अनेक ग्राहकांना प्रवास म्हटले की, क्लिअरट्रिपच आठवते. आम्ही विविध क्षेत्रांत विस्तारीकरण करत विकासाच्या नव्या संधी शोधत असतानाच या गुंतवणुकीमुळे आमच्या ग्राहकांना अधिक वैविध्यपूर्ण श्रेणी उपलब्ध करून देण्यास बळकटी मिळेल. क्लिअरट्रिम टीमचे या उद्योग क्षेत्राचे सखोल ज्ञान आणि तंत्रज्ञानात्मक क्षमता यांसह फ्लिपकार्ट समूहात आम्ही त्यांचे स्वागत करतो. आमच्या ग्राहकांना अधिक मूल्य आणि प्रवासानुभव देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

 क्लिअरट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक स्टुअर्ट क्रायटन म्हणाले, “आमच्या ग्राहकांसाठी प्रवासाचा अनुभव सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा पाया क्लिअरट्रिपने रचला. या उत्पादन केंद्री दृष्टिकोनामुळे आम्हाला या प्रदेशातील विविध बाजारपेठांमध्ये ग्राहकांसाठी पसंतीचे प्रवासी भागिदार बनणे शक्य झाले. फ्लिपकार्ट कुटुंबाचा भाग बनताना आम्हाला आनंद होत असून आमचे ग्राहक आणि एकूणच पर्यटन उद्योगावर या सहयोगाच्या होणाऱ्या सकारात्मक परिणामाबाबत आम्ही रोमांचित आहोत.” 

टॅग्स :फ्लिपकार्ट