नवी दिल्ली - भारतात करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचा फायदा दिसू लागला असून, भारत आता जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होण्याच्या मार्गावर असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे भारतीय मिशन चीफ रानिल सालागादो यांनी 2.6 ट्रिलीयन डॉलरपर्यंत पोहोलचलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना धावत्या हत्तीशी केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताजा अहवालानुसार 2019 साली मार्च महिन्यापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 7.3 वेगाने आणि त्यानंतर 7.5 टक्के वेगाने वाढेल. तसेच जागतिक वाढीमध्ये भारताचा वाटा 15 टक्के असेल. एक वार्षिक अहवाल सादर करताना सालगादो यांनी सांगितले कि, ''परचेंजिंग पॉवर पॅरिटी (पीपीपी) च्या बाबतीत एकूण जागतिक वाढीमध्ये 15 टक्के वाटा भारताचा असेल. मात्र भारताचा वाटा चीनच्या दर्जाचा नसेल. तसेच आयएमएफ भारताकडे दीर्घकालीन जागतिक वाढीचा स्रोत म्हणून पाहत आहे." "भारतातील उप्तादक लोकसंख्येमध्ये घट होण्यास अद्यार तीन दशकांचा काळ बाकी आहे. हा खूप मोठा काळ आहे. आशिया खंडात भारतासाठी ही एक संधी आहे. अगदी मोजक्याच आशियाई देशांकडे अशी संधी आहे. त्यामुळे पुढची तीन दशके किंवा त्याहून मोठ्या काळासाठी भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा स्रोत राहील. पुढच्या तीन दशकांमध्ये भारतात, तेच होईल जे काही वर्षांपूर्वी चीनमध्ये झाले होते." असेही सालगादो यांनी सांगितले.
भारतीय अर्थव्यवस्था धावत्या हत्तीसारखी, आर्थिक सुधारणांचे आयएमएफने केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 4:53 PM