Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय अर्थव्यवस्था उसळी घेणार; नाणेनिधीचा पुढील वर्षाबाबत अंदाज

भारतीय अर्थव्यवस्था उसळी घेणार; नाणेनिधीचा पुढील वर्षाबाबत अंदाज

परिणामी चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ही १०.३ टक्के एवढी कमी होण्याचा सुधारित अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अन्य देशांमधील घटही वाढणार असल्याचा अंदाज आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 11:51 PM2020-10-13T23:51:07+5:302020-10-13T23:51:47+5:30

परिणामी चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ही १०.३ टक्के एवढी कमी होण्याचा सुधारित अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अन्य देशांमधील घटही वाढणार असल्याचा अंदाज आहे

Indian economy to boom; IMF forecast for next year | भारतीय अर्थव्यवस्था उसळी घेणार; नाणेनिधीचा पुढील वर्षाबाबत अंदाज

भारतीय अर्थव्यवस्था उसळी घेणार; नाणेनिधीचा पुढील वर्षाबाबत अंदाज

वॉशिंग्टन : जगभरातील सर्वच अर्थव्यवस्थांना कोरोनाने दिलेल्या झटक्याने त्यांची घसरण सुरू आहे. असे असले तरी पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेऊन ८.८ टक्क्यांचा विकासदर गाठण्याची अपेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे. चालू आर्थिक वर्षात मात्र भारतीय अर्थव्यवस्थेत १०.३ टक्के एवढी घसरण होण्याचा अंदाजही नाणेनिधीने व्यक्त केला आहे. पुढील वर्षात भारत हा जगातील सर्वाधिक आर्थिक वाढ असलेला देश म्हणून पुढे येण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

जागतिक अर्थव्यवस्था ४.४ टक्क्यांनी घटणार
कोरोनाच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, चालू आर्थिक वर्षात ही अर्थव्यवस्था ४.४ टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सुधारित अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जगभरात मंदीची लाट आली असून, त्याचा परिणाम अर्थव्यवस्था घटण्यामध्ये होत असल्याचे नाणेनिधीने स्पष्ट केले आहे. चीनने कोरोनाच्या संकटावर मात केल्यानंतर आता त्यांची अर्थव्यवस्था पुन्हा वाढीच्या मार्गावर असल्याबाबत नाणेनिधीने आश्चर्य व्यक्त करतानाच यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या घसरणीत काही प्रमाणात घट होण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे. जून महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेच्या घसरणीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा आता त्यामध्ये ०.८ टक्क्यांनी अधिक घट होण्याची अपेक्षा वर्तविली आहे.

जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेलाही चालू वर्षी घसरणीचा सामना करावा लागणार आहे. चालू आर्थिक वर्षात अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये ५.८ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. पुढील वर्षी अमेरिकेतही वाढ होण्याचा अंदाज असून, सन २०२१-२२ मध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था ३.९ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा अहवालात वर्तविण्यात आली आहे.

जगाच्या शीत प्रदेशामध्ये (युरोप, उत्तर अमेरिका आणि पूर्व आशिया) हवामान बदलामुळे होणारे नुकसान हे उष्ण प्रदेशांपेक्षा कमी असण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. हवामान बदलामुळे कोणकोणत्या गोष्टींमध्ये बदल होत आहेत हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे यापासून अर्थव्यवस्थेला किती नुकसान झाले ते कळणे जरा कठीण असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जगाच्या आर्थिक प्रकृतीबाबतचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. नाणेनिधी तसेच जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीचा आधी जाहीर करण्यात आलेल्या या अहवालात चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था १०.३ टक्क्यांनी घटणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. कोरोनाचा फटका भारतालाही मोठ्या प्रमाणात बसल्याचे स्पष्ट करून नाणेनिधीने म्हटले आहे की, पुढील वर्षाच्या प्रारंभापासून भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेऊ शकते; मात्र आधी झालेल्या घसरणीमुळे संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार करता आर्थिक विकासाचा दर उणे राहणार आहे.

पुढील आर्थिक वर्षात (२०२१-२२) भारतीय अर्थव्यवस्था ही पुन्हा मोठी झेप घेण्याची शक्यता असल्याचे याच अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुढील आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ८.८ टक्के राहण्याची अपेक्षा असून, हा जगातील सर्वोत्तम विकास दर राहण्याची शक्यता आहे. आगामी वर्षात चीनचा विकास दर ८.२ टक्के राहण्याचा अंदाजही नाणेनिधीने वर्तविला आहे. मार्च महिन्यात जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था ९.६ टक्के दराने घटणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र कोरोनामुळे भारतातील स्थिती अद्यापही गंभीर स्वरूपाची असून, त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसत असल्याने याबाबतचा नवीन अंदाज आता बांधण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था २३ टक्के घटली होती. त्यामध्ये दुसऱ्या तिमाहीत आणखी वाढ झाली असून, अर्थव्यवस्थेतील घट २५ टक्क्यांपर्यंत गेली आहे. परिणामी चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ही १०.३ टक्के एवढी कमी होण्याचा सुधारित अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अन्य देशांमधील घटही वाढणार असल्याचा अंदाज आहे.
 

 

Web Title: Indian economy to boom; IMF forecast for next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.