नवी दिल्ली : कोरोनाच्या फटक्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात नऊ टक्क्यांनी कमी होण्याची भीती आशियाई विकास बॅँकेने व्यक्त केली आहे. चार वर्षांत प्रथमच भारतीय अर्थव्यवस्था घसरणार असून, पुढील वर्षात तिच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.आशियाई विकास बॅँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ यासुयुकी सावडा यांनी भारतासह आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेबाबतचा अहवाल प्रसिद्धीला दिला त्यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था पुढीलवर्षी पुन्हा चांगली कामगिरी करेल असा आशावादही व्यक्त केला आहे.भारतामध्ये मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आले. या कडक कारवाईमुळे भारतीय अर्थव्यवस्था लवकर काम करण्यास लागल्याचे सावडा यांनी सांगितले. असे असले तरी कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका भारताला मोठ्या प्रमाणात बसला असून, चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ९ टक्क्यांनी घटण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.लॉकडाऊनमुळे भारताच्या खासगी क्षेत्रातील खर्च पूर्णपणे थांबला होता. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. जसजसे उद्योग सुरू झाले तशा प्रमाणात अर्थव्यवस्था वेग घेऊ लागली. जूनमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ४ टक्के घसरण्याची शक्यता आशिया विकास बँकेने व्यक्त केली होती. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेल्याने ही घसरण आता ९ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भारतातील परिस्थिती आता बरीच सुधारली असून, अनेक उद्योग, धंदे सुरू झाले आहेत. त्यामुळे तिसऱ्या व चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्था वाढ दाखवू शकेल, असे सावडा यांनी सांगितले. पुढील आर्थिक वर्ष हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी उज्ज्वल राहण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखविली. पुढील वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ८ टक्क्यांवर जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.याआधी स्टॅण्डर्ड अॅण्ड पुअर, मुडीज, फीच या पतमापन संस्था तसेच जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व इतर महत्त्वाच्या वित्त संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.आशियामध्ये ६० वर्षांतील मोठी घटआशियामधील विकसनशील अर्थव्यवस्थांमध्य चालू वर्षामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आशियाई विकास बॅँकेने व्यक्त केली आहे. गेल्या ६० वर्षांमधील ही सर्वात भीषण परिस्थिती असल्याचे मतही वर्तविले आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये आशियाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ०.७ टक्कयांनी घट होणार आहे. मात्र आगामी वर्ष हे उत्कर्षाचे असेल, असे भाकीतही करण्यात आले आहे. आगामी वर्षामध्ये आशियाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ६.८ टक्कयांनी वाढ होण्याची शक्यता बॅँकेने व्यक्त केली आहे. कोरोनाचा उद्रेक ज्या चीनमध्ये झाला तेथील अर्थव्यवस्था आता रुळावर येत असून, चालू आर्थिक वर्षात तिच्यामध्ये १.८ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत होईल नऊ टक्के कपात, आशियाई बॅँकेचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 1:25 AM