नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेची चाके गेल्या एका वर्षात वेगाने रुळावर आल्याने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्था १३.५ टक्के दराने वाढली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत (२०२१-२२) जीडीपी वाढीचा दर २०.१ टक्के होता.अनेक विश्लेषकांनी देशाचा आर्थिक विकास दर तुलनात्मक आधारावर दुहेरी अंकात राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.रेटिंग एजन्सी इक्राने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर १३ टक्के असेल, तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार तो १५.७ टक्के असेल, असा अंदाज वर्तवला होता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या महिन्यात आपल्या पतधोरण आढाव्यात २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर १६.२ टक्क्यांच्या आसपास राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. २०२२ च्या एप्रिल-जून तिमाहीत चीनचा विकास दर ०.४ टक्के होता.
चालू आर्थिक वर्षासाठी ७.२ % वाढीचा अंदाजआरबीआयने या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या चलनविषयक धोरणाच्या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर १६.२% च्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवली आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष २०२३ साठी जीडीपी वाढीचा अंदाज ७.२% वर कायम ठेवला आहे.