संयुक्त राष्ट्रे : यंदा भारताची अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.‘जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि भवितव्य’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, भारताची अर्थव्यवस्था हळूहळू गतिमान होताना दिसत आहे. २0१६ आणि २0१७ या वर्षांत अर्थव्यवस्था अनुक्रमे ७.३ टक्के आणि ७.५ टक्के दराने वाढेल. विशेष म्हणजे देशांतर्गत आर्थिक सुधारणांच्या बाबतीत काही प्रमाणात उशीर होताना दिसत आहे, तरीही अर्थव्यवस्था वाढीच्या मार्गावर आहे. ही प्रशंसनीय बाब आहे. अहवालात म्हटले आहे की, २0१५मध्ये ६.९ टक्के वाढीचा दर असलेल्या चीनमध्ये यंदाही मंदीचा फेरा कायम राहील. चीनची अर्थव्यवस्था २0१६मध्ये ६.४ टक्के, तर २0१७मध्ये ६.५ टक्के दराने वाढेल. चीनमधील मंदी अपेक्षेपेक्षा मोठी आहे. त्याचा परिणाम व्यापक राहील असे दिसते. विशेषत: व्यापार, वित्तीय आणि वस्तू बाजार यावर प्रतिकूल परिणाम पाहावयास मिळेल. वस्तूआधारित अर्थव्यवस्थांवर कर्जाचे संकट निर्माण होण्याचा धोका आहे. संयुक्त राष्ट्रांचा हा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभाग तसेच संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद यांनी संयुक्तरीत्या प्रसिद्ध केला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था ७.३% वाढणार
By admin | Published: May 13, 2016 4:38 AM