नवी दिल्ली : २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊन वृद्धीदर ५ टक्के होईल, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. कोविड-१९ साथीचा फटका बसल्याने २०२० मध्ये भारतीयअर्थव्यवस्था ६.९ टक्क्यांनी घसरणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास परिषदेने (यूएनटीएडी) जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, यंदा जगाची अर्थव्यवस्था ४.७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये हा अंदाज ४.३ टक्के होता. अमेरिकेतील सुधारणेचा मजबूत वेग आणि १.९ लाख कोटी रुपयांचे नवे वित्तीय प्रोत्साहन याचा हा परिणाम आहे. २०२० मध्ये भारताची घसरण आधी ५.९ टक्के अनुमानित करण्यात आली होती. तथापि, ताज्या अनुमानानुसार घसरण ६.९ टक्के राहील. सन २०२१ मध्ये मात्र भारतीय अर्थव्यवस्था ५ टक्के वृद्धीसह जोरदार पुनरागमन करेल.
मुडीजचा अंदाज १२ टक्के वाढीचामुडीज या आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेने २०२१ या कॅलेंडर वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर १२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने आता चांगली गती पकडली असून तिच्या विकासाचा दर अपेक्षेहून अधिक असल्याचे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर देशांतर्गत मागणी वाढली असून त्यामुळे उत्पादनामध्येही वाढ होत आहे. याचा परिणाम डिसेंबर अखेरच्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये दिसून आला. सन २०२१मध्ये देशांतर्गत तसेच परदेशातून मागणी वाढती राहण्याची शक्यता असल्यामुळे विकासाचा दर चांगला राहील. याशिवाय परदेशी गुंतवणूकही वाढण्याची शक्यता असल्याने विकासदर १२ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज मुडीजने व्यक्त केला आहे.