नवी दिल्ली - गतवर्षी 1 जुलै रोजी देशात जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून या नव्या कर प्रणालीशी जुळवून घेताना छोटेमोठे व्यापारी, उद्योजक आणि दुकानदारांची तारांबळ उडाली होती. मात्र आता जीएसटीचे मळभ दूर झाले असून, येत्या दोन वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही जगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची 7.3 टक्क्यांनी वाढ होणार आहे. तर पुढील दोन वर्षांमध्ये हीच वाढ 7.5 टक्क्यांनी होण्याची शक्यता आहे. गेल्या दीड वर्षापासून भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीला खीळ घालणारे फॅक्टर आता पूर्णपणे संपुष्टात आले आहेत, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. जागतिक बँकेने ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्सचा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. या अहवालानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेतील वाढीच्या अनुमानावरून देशांतर्गत विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे तसेच गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सलग पाच तिमाहींमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ मंदावल्यानंतर 2017 च्या मध्यावर ही वाढ आपल्या निचांकावर पोहोचली होती. त्यानंतर मात्र अर्थव्यवस्थेच्या वाढीने वेग घेतला असून, 2018 साली भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा तेजी दिसू लागली आहे. 2017 साली जीएसटी लागून करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळामधून भारतीय अर्थव्यवस्था सावरली आहे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग आऊटपूट आणि इंडस्ट्रियल प्रॉडक्शनमध्ये वेगाने वाढ होत आहे. एवढेच नाही तर देशातील दरडोई उत्पन्नामध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे गरिबी हटवण्यास मदत होईल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
GST चे मळभ दूर; भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरू, जागतिक बँकेचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 2:16 PM