Blinkit News : १० मिनिटांत खाण्या-पिण्याच्या पदार्थांची डिलिव्हरी करणारी ब्लिंकिट (Blinkit) ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. खरं तर अन्न सुरक्षा विभागानं हैदराबादच्या एका भागात ब्लिंकिटच्या गोदामावर छापा टाकला. या छाप्यात गोदामात सुरक्षेच्या अनेक उपाययोजनांचे पालन केलं जात नसल्याचं अन्न सुरक्षा विभागाच्या निदर्शनास आलं. ब्लिंकिट ही फूड अॅग्रीगेटर प्लॅटफॉर्म झोमॅटोची कंपनी आहे.
काय म्हटलं विभागानं?
अन्न सुरक्षा विभागाच्या म्हणण्यानुसार, या छाप्यात ब्लिंकिटच्या स्वच्छता प्रोटोकॉलचा अभाव दिसून आला. त्याचबरोबर या ठिकाणी एक्सपायर झालेले खाद्यपदार्थही आढळून आले. अन्न सुरक्षा आयुक्तांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भातील माहिती दिली. 'कामाक्षी फूड्स लायसन्सद्वारे तयार केलेले प्रोडक्ट एक्सपायर झाल्याचं आढळून आलं. याशिवाय रवा, रॉ पिनट बटर, मैदा, पोहे, बेसन, बाजरी हे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही उत्पादने सुमारे ३०,००० रुपयांची आहेत,' असं त्यांनी एक्सवर म्हटलंय.
तसंच ५२ हजार रुपये किमतीचं नाचणीचं पीठ आणि तूरडाळ असे इतर पदार्थही खराब झाल्याचा संशय विभागाला आहे. ही उत्पादनं जप्त करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचं आयुक्तांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. शिवाय हा परिसर अत्यंत अस्ताव्यस्त व अस्वच्छ असल्याचं विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आं. त्याचबरोबर साठवणुकीचे रॅकवरही धुळ असल्याचं दिसून आल्याचं त्यांनी म्हटलंय.
कंपनीनं काय म्हटलं?
"आम्ही सुरक्षा आणि स्वच्छतेच्या मानकांना अतिशय गांभीर्याने घेतो. सुधारात्मक कारवाई लागू करण्यासाठी आम्ही आमच्या वेयरहाऊस पार्टनर्स आणि अन्न सुरक्षा विभागासह एकत्र काम करत आहोत," अशी प्रतिक्रिया ब्लिकिंटच्या प्रवक्त्यानं मनीकंट्रोलला दिली. ब्लिंकिट अनेक भारतीय शहरांमध्ये कार्यरत आहे. १० मिनिटांत ऑर्डर डिलिव्हरी कंपनी प्रसिद्ध आहे. ही डिलिव्हरी डार्क स्टोअर्सद्वारे केली जाते.