Indian GDP: 5 राज्यांमध्ये मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. यादरम्यान, केंद्र सरकारला चांगलीच बातमी मिळाली आहे. दुसऱ्या तिमाहीत देशाच्या जीडीपीचा आकडा 7.5 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच NSO ने गुरुवारी GDP ची आकडेवारी जाहीर केली. आकडेवारीनुसार, विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा भारताच्या जीडीपीमध्ये दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) 7.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर वर्षभरापूर्वी याच काळात देशाचा जीडीपी 6.2 टक्के होता. विशेष म्हणजे देशाची मध्यवर्ती बँक आरबीआयनेच 6.5 टक्के अपेक्षित वाढ धरली होती.
India's GDP grew 7.6% in July-September quarter
— ANI Digital (@ani_digital) November 30, 2023
Read @ANI Story | https://t.co/Ay1yn4QmkJ#indiagdp#GDP#RealGDP#RBIpic.twitter.com/d8krztZFTi
GDP किती झाला?
NSO ने दिलेल्या माहितीनुसार, 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत GDP 41.74 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे, तर 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत 38.78 लाख कोटी होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत देशाचा विकास दर 6.2 टक्के होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दर निर्धारण समितीने ऑक्टोबरच्या बैठकीत विकास दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
उत्पादन आणि खाण क्षेत्रात तेजी
दुसऱ्या तिमाहीत कृषी, पशुधन, वनीकरण आणि मासेमारी उद्योगांमध्ये 1.2 टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ही वाढ 2.5 टक्के होती. दरम्यान, खाणकाम आणि उत्खननात 10 टक्के वाढ झाली आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत 0.1 टक्के वाढ झाली होती. उत्पादन क्षेत्रातही प्रचंड वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत हा आकडा 13.9 टक्के होता. जो गेल्या वर्षी याच कालावधीत 3.8 टक्के होता. ग्राहकांच्या मागणीने जीडीपी वाढीसाठी सुमारे 60% योगदान दिले. अनियमित मान्सूनमुळे चलनवाढीचा दबाव असूनही, भारताच्या 1.4 अब्जाहून अधिक लोकसंख्येची मागणी स्थिर आहे.