लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: फेब्रुवारी २०२४ मध्ये भारताची निर्यात वाढून २० महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. अमेरिका, यूएई, सिंगापूर आणि दक्षिण आफ्रिका या देशांना होणाऱ्या निर्यातीत वाढ झाल्यामुळे भारताची निर्यात २ अंकी होऊ शकली, असे तज्ज्ञांनी सांगितले. प्राप्त आकडेवारीनुसार, निर्यात सलग तिसऱ्या महिन्यात तेजीत राहिली.
एका अहवालानुसार, अमेरिकेला भारतातून स्मार्टफोनची निर्यात सर्वाधिक होत आहे. पॉलिश केलेल्या हिऱ्यांची निर्यात दुसऱ्या स्थानी आहे. या काळात ३८ कोटी डॉलरचे हिरे भारताने अमेरिकेला निर्यात केले. इलेक्ट्रॉनिक साहित्याची निर्यातही भारतातून मोठ्या प्रमाणात होते.
- फेब्रुवारीमध्ये यूएईला ३.५ अब्ज डॉलरची निर्यात भारताने केली. यात ३१.७ कोटी डॉलरचे सोने, २३.७ कोटी डॉलरचे स्मार्टफोन व २४.३ कोटी डॉलरचे पेट्रोल यांचा समावेश आहे.
- भारताच्या निर्यातीच्या बाबतीत सिंगापूर १६ व्या स्थानावरून १० व्या स्थानावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेला होणारी निर्यात दुपटीने वाढून १.१६ अब्ज डॉलर झाली आहे.
निर्यात वाढीचे प्रमाण किती?
- अमेरिका २२%
- यूएई २३.१%
- सिंगापूर ५१.६%
- द. आफ्रिका १००%