नवी दिल्ली – केस कापण्याचा व्यवसाय लोकं हे छोटं काम असल्याचे मानतात. परंतु काळानुरुप या व्यवसायात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आज केस कापण्याचे काम फॅशनशी जोडले जाते. केस कापणारे आज लाखो रुपयांची कमाई करत आहेत. आधीच्या काळात खुर्चीवर छोट्या आरशासमोर काही पैशात तुम्ही केस कापू शकत होता आता मोठमोठे सलून आले आहेत. या सलूनमध्ये लग्झरी सुविधांसह तुम्ही आरामात केस कापून घेऊ शकता.
केस कापण्याच्या या उद्योगात एका व्यक्तीचे मोठे योगदान आहे. प्रसिद्ध हेअर स्टायलिश जावेद हबीब यांनी हे काम करून कोट्यवधीची कमाई केली आहे. जावेद हबीब, बॉलिवूड सेलिब्रिटीजचे फेव्हरेट हेअर स्टायलिस्ट आहेत. ब्यूटी इंडस्ट्रीत त्यांचे बरेच नाव आहे. देश-परदेशात जावेद हबीब यांचे सलून आहेत. केस कापण्याच्या व्यवसायात ते कोट्यवधीची कमाई करतात. परंतु खूप कमी लोक जाणतात की, जावेद हबीब यांचे शिक्षण परदेशात झाले आहे. लंडनच्या मॉरिस इंटरनॅशनल स्कूलमधून त्यांनी पूर्ण शिक्षण घेतले आहे. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातून फ्रेंचची डिग्री घेतलीय. जावेद हबीब यांना आधी हॉटेल मॅनेजमेंट करायची इच्छा होती. परंतु नशिबाने त्यांना त्यांच्या अनेक पिढ्यांपासून सुरू असलेल्या व्यवसायाकडे ओढले.
जावेद हबीब यांचे आजोबा नजीर अहमद लॉर्ड माऊंटबेटनसह ब्रिटीश सरकारच्या बड्या अधिकाऱ्यांचे पर्सनल हेअर ड्रेसर होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ते पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पर्सनल हेअर ड्रेसर बनले. आजोबानंतर त्यांचा मुलगा जावेद हबीब यांचे वडील नेहरूंकडे पर्सनल हेअर ड्रेसर होते. नेहरूंशिवाय ते राजमाता गायत्री देवी आणि देशातील अनेक राष्ट्रपतींचे ड्रेसर होते. त्यांचे कुटुंब राष्ट्रपती भवनातच राहायला होते. जावेद हबीब यांचा जन्मही राष्ट्रपती भवनातील ब्लॉक नंबर १२ च्या हाऊस नंबर ३२ मध्ये झाला.
जावेद यांना केस कापण्याचा व्यवसाय करायचा नव्हता. लंडनमधील शिक्षणावेळी त्यांनी मॅकडोनाल्डचे आऊटलेट पाहिले. हाच व्यवसाय पुढे जाऊन करायचा हे त्यांनी ठरवले. मात्र त्यांच्या मनात विचार आला की, लोक बर्गर विकून पैसे कमावतात तर हेअर ड्रेसिंग ही लोकांची गरज आहे. मग जावेद यांनी वडिलांकडून हेअरड्रेसिंगमधील बारकावे शिकून घेतले. वडिलांच्या सांगण्यावरून लंडर हेअर डिझाईनिंग स्कूलमधून प्रोफेशनल कोर्स केला आणि त्यानंतर केस कापण्याचा व्यवसाय सुरू केला. जावेद हबीब यांनी केस कापण्याच्या व्यवसायाला ट्रेंडी आणि स्टायलिश रुप दिले. पहिल्याच वर्षी त्यांनी ५० हून अधिक सलून उघडले.
जावेद हबीब हे हबीब हेअर अँन्ड ब्यूटी लिमिटेडचे सीईओ आहेत. काही वर्षात ते सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट बनले. जावेद हबीब बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता-अभिनेत्रीचे हेअर लूक मॅनेज करतात. जावेद हबीब यांनी त्यांच्या कामात इतकं प्राविण्य मिळवलंय की, आज ते राजकीय नेते, उद्योगपती आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर म्हणून ओळखले जातात. आज संपूर्ण भारतात जावेद हबीब यांचे ९०० हून अधिक सलून आहेत. देशातील ११५ शहरातील अधिक ठिकाणी सलून दिसतील. सलूनशिवाय ६५ हेअर इन्स्टिट्यूट ते चालवतात. फोर्ब्सनुसार, जावेद हबीब यांची एकूण संपत्ती ३०० कोटीहून अधिक आहे. जावेद हबीब यांनी २४ तासांत ४१० जणांचे हेअर कट करून लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.