नवी दिल्ली - गेल्या काही काळात तिकिटांचे दर घटल्याने विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. मात्र असे असले तरी भारतातील हवाई वाहतूक उद्योग संकटात सापडला असून, विमान कंपन्यांचा एकूण तोटा हा 13 हजार 557 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एव्हिएशन कन्सल्टिंग फर्म सीएपीए इंडियाने दिलेल्या माहितीनुसार वाढता खर्च आणि तुलनेने कमी तिकीट दर यामुळे एअर इंडिया आणि जेट एअरवेजसारख्या कंपन्यांचा तोटा वाढत चालला आहे. सीएपीएने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात रुपयाच्या मूल्यात झालेली घट आणि तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे एअरलाइन्स कंपन्यांचा तोटा वाढत चालला आहे. सीएपीएने सांगितले की तोटा भरून काढण्यासाठी तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडची इंडिगो एअरलाइन्स वगळता इतर कुठल्याही एअरलाइन्सची बॅलन्स शिट मजबूत नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे.भारतातील देशांतर्गत हवाई वाहतूक उद्योग वेगाने विस्तारित होत आहे. येथील एअरलाइन्स कंपन्यांनी शेकडो नव्या एअरबस एसई आणि बोईंग जेट्स यांच्या ऑर्डर दिलेल्या आहेत. विमानामधील सुमारे 90 टक्के जागा नेहमी बूक होत असूनही नफा मिळवण्यासाठी कंपन्यांना आटापिटा करावा लागत आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या एअर इंडियासग अन्य भारतीय हवाई कंपन्यांना आपली बँलन्स शिट वाढवण्यासाठी सुमारे 21 हजार कोटी रुपयांच्या मदतीची तातडीने आवश्यकता असल्याचे सीएपीएने सांगितले आहे. दरम्यान, तोट्यात असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची विक्री करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. मात्र या विमान कंपनीला अद्याप खरेदीदार मिळालेला नाही.
भारतातील हवाई वाहतूक उद्योग संकटात, सुमारे 13 हजार कोटींचा तोटा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 6:22 PM