Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय आयटी उद्योग एच-१ बी व्हिसावर अवलंबून नाही

भारतीय आयटी उद्योग एच-१ बी व्हिसावर अवलंबून नाही

भारतातील आयटी उद्योग हा अमेरिकेच्या एच-१ बी व्हिसावर अवलंबून असल्याचा समज चुकीचा असल्याचे मत इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांनी व्यक्त केले आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2017 12:35 AM2017-06-23T00:35:52+5:302017-06-23T00:35:52+5:30

भारतातील आयटी उद्योग हा अमेरिकेच्या एच-१ बी व्हिसावर अवलंबून असल्याचा समज चुकीचा असल्याचे मत इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांनी व्यक्त केले आहे

Indian IT industry is not dependent on H-1B visas | भारतीय आयटी उद्योग एच-१ बी व्हिसावर अवलंबून नाही

भारतीय आयटी उद्योग एच-१ बी व्हिसावर अवलंबून नाही

वॉशिंग्टन : भारतातील आयटी उद्योग हा अमेरिकेच्या एच-१ बी व्हिसावर अवलंबून असल्याचा समज चुकीचा असल्याचे मत इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारने या व्हिसाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करत यामुळे अमेरिकी नागरिकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळल्याचाही ठपका ठेवलेला आहे.
अमेरिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या विदेशी कर्मचाऱ्यांसाठी हा व्हिसा अस्थायी स्वरूपात देण्यात येतो. भारतातील सॉफ्टवेअर कंपन्यांत हा व्हिसा लोकप्रिय आहे. सिक्का यांचे म्हणणे आहे की, भारतीय आयटी कंपन्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या संधी शोधाव्या लागणार आहेत. बुद्धिमत्तेच्या माध्यमातून भारत आयटी क्षेत्रात आपले अव्वल स्थान कायम ठेवू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार असून, या वेळी ते ट्रम्प यांच्यासमक्ष एच-१ बी व्हिसाचा मुद्दा उपस्थित करू शकतात.
सिक्का म्हणाले की, अधिकाधिक काम आता स्वयंचलित होत आहे. भारतीय कंपन्यांना नव्या क्षेत्रांकडे लक्ष देण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, इंटरनेट ओपनिंग, व्हाईस इंटरफेस आणि चॅट इंटरफेस, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, सायबर सेक्युरिटी या क्षेत्रात लक्ष देण्याची गरज आहे. ते म्हणाले की, मला असे वाटते भविष्यात आमच्या जीवनातील प्रत्येक मूल्य सॉफ्टवेअर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बदलत आहे. त्यामुळे आम्हाला हे सर्व आत्मसात करण्याची गरज आहे. आम्ही येथे दोन वर्षांत १० हजार नवे रोजगार निर्माण करण्याबाबत विचार करत आहोत. यावर आम्ही कामही सुरू केले आहे. पहिले केंद्र आम्ही अमेरिकेतील इंडियनपोलीसमध्ये सुरू करत आहोत. या माध्यमातून पुढील वर्षी ५०० लोकांना नोकरी देणार आहोत. भारतीय आयटी उद्योगाने अमेरिकी अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे आणि पुढेही देत राहील, असेही सिक्का म्हणाले. (वृत्तसंस्था)

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सिक्का म्हणाले की, आम्ही एच-१ बी व्हिसावर अवलंबून नाही. आकडेवारीच सांगायची तर, गत १० वर्षांत
६५ हजार एच १ बी व्हिसा दरवर्षी जारी करण्यात आले. याप्रकारे १० वर्षांत ६,५०,००० व्हिसा जारी झाले. पण, आमच्या आयटी कंपनीने यापेक्षा अधिक रोजगार दिले आहेत. एकट्या इन्फोसिसचे दोन लाख कर्मचारी आहेत. टीसीएस यापेक्षा दुप्पट लोकांना नोकऱ्या देते. त्यामुळे आम्ही
एच १ बी व्हिसावर अवलंबून आहोत असे म्हणणेच चुकीचे आहे.

भारतीय आयटी उद्योग देणार दीड लाख नोकऱ्या
भारतीय आयटी उद्योग २०१७-१८ या वर्षात १.३ ते १.५ लाख रोजगार उपलब्ध करून देईल, असा विश्वास नॅसकॉमचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी व्यक्त केला आहे. गतवर्षी आयटी क्षेत्रात १.७ लाख कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. तथापि, चालू वर्षात भारतीय आयटी क्षेत्रातील निर्यातीत ७.८ टक्के वाढ होईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. देशांतर्गत बाजारात १० ते ११ टक्के वाढ होण्याचा अंदाज यात व्यक्त करण्यात आला आहे. चंद्रशेखर म्हणाले की, भारताबाहेरील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये राजकीय आणि आर्थिक अनिश्चितता लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतील. गतवर्षीची आयटी कंपन्यांची कामगिरी पाहता नॅसकॉमला सकारात्मक भविष्याची आशा आहे. जागतिक आयटी क्षेत्रात भारताचा हिस्सा वाढत आहे, असेही ते म्हणाले. भारतीय आयटी उद्योगाचा आकार १५४ अब्ज डॉलरवर आला आहे. गतवर्षी यात ११ अब्ज डॉलरची वाढ झाली होती.

Web Title: Indian IT industry is not dependent on H-1B visas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.