योकोहामा (जपान) : भारतीय बाजाराच्या अपार क्षमतेचा पुरेपूर फायदा घेण्यासासाठी भारतीय बाजार नियंत्रणमुक्त करणे आणि थेट विदेशी गुंतवणुकाभिमुख करणे जरूरी आहे, असे मत व्यक्त करीत आशियायी विकास बँकेने (एडीबी) वस्तू व सेवाकर (जीएसटी) प्रणाली लागू करून अप्रत्यक्ष कर एकत्रित करण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसाही केली.आशियायी विकास बँकेच्या ५० व्या वार्षिक बैठकीच्या आधी बोलताना एडीबीचे अध्यक्ष ताकेहिको नकाओ म्हणाले की, भारताने अद्याप पूर्ण क्षमतेचा वापर केलेला नाही. यावेळी सदस्य देशांचे वित्तमंत्री आणि केंद्रीय बँकांचे प्रमुख उपस्थित होते. चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धीदर ७.४ टक्के राहील. पुढील आर्थिक वर्षात वृद्धीदर ७.६ टक्क्यांवर जाईल, असे भाकीतही एडीबीने व्यक्त केले. भारतात भरपूर क्षमता आहे; परंतु भारतीय बाजाराने अधिक एकात्मिक होणे जरूरी आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अधिकारात योग्य ताळमेळ असला पाहिजे, असेही ताकेहिको नकाओ यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. एकात्मिक बाजार म्हणजे काय, हे स्पष्ट न करता ते म्हणाले की, अधिकाधिक नियंत्रणमुक्त आणि जास्तीत जास्त प्रमाणात थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासह आशिया आणि जगातील अन्य भागाशी सांगड असलेली बाजारपेठ असावी. अमेरिकेसारख्या विकसित देशांचा संरक्षणवाद आशियाच्या विकास वाढीवर परिणाम करणारा नसावा. याचबरोबर भारताच्या विकास वृद्धीची वाटचाल कशी असावी, हे ठरविणारी नसावी. भारत सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा जरूर परिणाम झाला आहे. तथापि, तो आता स्थिर आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)सुधारणा प्रक्रियेला अधिक गती मिळत आहेवस्तू व सेवा करप्रणाली लागू करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांमुळे सुधारणा प्रक्रियेला अधिक गती मिळत आहे, असेही ते म्हणाले. संरक्षणवादावर ते म्हणाले की, मुक्त व्यापारप्रणाली आणि उपक्रमशील योजनाकडे मोर्चा वळविण्याच्या प्रयत्नांमुळे आशियायी अर्थव्यवस्था वृद्धी करीत आहे. आर्थिक वृद्धीसाठी मुक्त व्यापार अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. संरक्षणवादाचा आशियामागे घोशा लागला आहे. तथापि, संरक्षणवादाचा आमच्या आर्थिक वृद्धीवर परिणाम होऊ नये म्हणून आर्थिक वृद्धीची गती कायम राखण्यासाठी व्यापार अधिक खुला करण्यावर भर दिला पाहिजे.
भारतीय बाजार अधिक नियंत्रणमुक्त असावा!
By admin | Published: May 05, 2017 12:51 AM