भारतीय वंशाचे अजय बंगा हे जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष असतील. जागतिक बँकेच्या २५ सदस्यीय कार्यकारी मंडळानं बुधवारी (३ मे) अजय बंगा यांची अध्यक्षपदी निवड केली. त्यांचा कार्यकाळ २ जूनपासून सुरू होणार आहे.
अजय बंगा यांच्या नियुक्तीनंतर, जागतिक बँकेनं एका निवेदन प्रसिद्ध केलं. संचालक मंडळ बंगा यांच्यासोबत जागतिक बँक समूह विकास प्रक्रियेवर काम करण्यास उत्सुक आहे. एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीत या विकास प्रक्रियेवर एकमत झालं. याशिवाय, विकसनशील देशांसमोरील कठीण विकास आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रयत्नांवर एकत्र काम करावे लागणार असल्याचं निवदेनात म्हटलं आहे.
बायडेन यांनी केलेलं कौतुक
‘इतिहासातील या गंभीर क्षणी’ जागतिक संस्थेचे नेतृत्व करण्यासाठी अमेरिका अजय बंगा यांना जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून नामांकित करत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले होते. तसंच या जागतिक संस्थेचं नेतृत्त्व करण्यास बंगा हेच उत्तम व्यक्ती असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
कोण आहेत बंगा?
मास्टरकार्डचे माजी प्रमुख बंगा सध्या अटलांटिकमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करतात. २०१६ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित केलं होतं. जागतिक बँकेच्या संचालक मंडळाच्या मान्यतेने, बंगा हे जगातील २ सर्वोच्च वित्तीय संस्थांचे प्रमुख होणारे पहिले भारतीय-अमेरिकन व अमेरिकन-शीख बनतील. त्यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.