Vande Metro Train : मागील काही वर्षांमध्ये भारतीय रेल्वेमध्ये खुप सुधार झाला आहे. पूर्वी रेल्वे काही तास उशीराने यायच्या, पण आता असे क्वचितच घडते. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरल्यामुळे रेल्वेचा मोठ्या प्रमाणात विकास होतोय. अशातच सरकारने 'वंदे भारत'सारख्या हायस्पीड ट्रेन आणल्यामुळे हा प्रावस सुलभ आणि आरामदायी झाला आहे. पण, अजूनही भारतील रेल्वेला 100 ते 200 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अनेक तास लागतात. मात्र, आता लवकरच यावर कायमचा तोडगा निघणार आहे. रेल्वे विभागाने एक योजना आखली आहे, ज्यामुळे प्रवास काही मिनिटांत पूर्ण होईल.
सध्या जास्त अंतराच्या प्रवासासाठी वंदे भारत ट्रेन सुरू आहेत, पण जुलैमध्ये कमी अंतराच्या वंदे मेट्रो ट्रेनची ट्रायल रन सुरू होणार आहे. तसेच, पुढच्या महिन्यात(मे) वंदे भारतच्या स्लीपर ट्रेनची ट्रायल रनदेखील सुरू होईल. सिटींग वंदे मेट्रो 100 ते 250 किलोमीटरच्या मार्गावर धावतील, तर स्लीपर वंदे भारत मेट्रो 1,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या मार्गांवर धावेल. या नवीन वंदे मेट्रो ट्रेन सुमारे 124 शहरांना जोडेल.
ट्रेनचा वेग वाढणार...
नवीन वंदे मेट्रो गाड्या पूर्णपणे एसी असतील आणि सध्याच्या रेल्वे रुळांवरच धावतील. या गाड्या त्यांच्या सभोवतालची मोठी शहरे आणि लहान शहरे जोडण्याचे काम करतील. या गाड्यांमधील जनरल डब्यातून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील. रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासाला लागणारा वेळ कमी करण्यासाठी ट्रेनचा वेगही पूर्वीपेक्षा थोडा वाढवला जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक ट्रेनला 12 डबे असतील, पण गरज भासल्यास डब्ब्यांची संख्या 16 वर नेण्यात येईल.
50 नवीन अमृत भारत ट्रेन येणार
गाड्यांच्या आधुनिकीकरणाच्या योजनेअंतर्गत रेल्वेने यावर्षी 50 नवीन अमृत भारत गाड्या चालवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या गाड्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूला इंजिन बसवून चालवल्या जातील, ज्यामुळे त्यांना दिशा बदलणे सोपे आणि जलद होईल. या गाड्यांचा फायदा असा आहे की, लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमी किमतीत प्रवास करता येईळ. अशा प्रकारची पहिली ट्रेन दिल्ली ते अयोध्या दरम्यान धावत आहे. या नवीन गाड्या 2026 पर्यंत सुरू होतील. तसेच, आगामी काळात अशा सुमारे 400 अमृत भारत गाड्या चालवण्याची रेल्वेची योजना आहे.