Life Certificate : पेन्शनधारकांसाठी दरवर्षी बँकेत जाऊन हयातीचा पुरावा द्यावा लागतो. हा दाखला मिळवण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. मात्र, आता ही कटकट कायमची संपणार आहे. पेन्शनधारकांना आता जीवन प्रमाणपत्रासाठी दरवर्षी बँक किंवा कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. एका अॅपच्या मदतीने घरबसल्या सर्टिफिकेट बनवता येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची धावपळ वाचणार आहे. रेल्वेने उत्तर पश्चिम रेल्वे विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा सुरू केली आहे. ही प्रणाली हळूहळू इतर झोनमध्येही लागू केली जाईल.
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उत्तर पश्चिम रेल्वे, कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने संयुक्तपणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रणाली लागू केली आहे. या अंतर्गत, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने नेशन वाईड डिजिटल लाइफ सर्टिफिकेट कॅम्पेन ३.० सुरू केले आहे. आता रेल्वे पेन्शनधारकांना दरवर्षी दिले जाणारे जीवन प्रमाणपत्र घरी बसून देता येणार आहे. अॅपच्या मदतीने ही सुविधा घेता येईल.
८०० शहरांत मिळणार सुविधानेशन वाइड डिजिटल लाइफ सर्टिफिकेट कॅम्पेन ३.० च्या माध्यमातून ८०० शहरांमध्ये ही सुविधा दिली जाईल. नवीन सुविधा सुरू केल्यानंतर, उत्तर पश्चिम रेल्वेच्या ५० हजारांहून अधिक पेन्शनधारकांना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून त्यांचे पेन्शन पेमेंट मिळू शकणार आहे. यासाठीची सुविधा रेल्वेच्या सर्व झोन आणि विभागांच्या बँकांमध्ये चालवली जाणार आहे.
कसे मिळवायचे जीवन प्रमाणपत्र?रेल्वे मंत्रालयाकडून यासाठी एक अॅप लॉन्च करण्यात आले आहे, ज्याद्वारे फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे पेन्शनधारकाचा चेहरा स्कॅन करून जीवन प्रमाणपत्र जारी केले जाऊ शकते. यासाठी सर्वात आधी मोबाईलमध्ये अॅप इन्स्टॉल करावे लागेल. अॅपमधील स्कॅनर ओपन होताच मोबाईल चेहऱ्यासमोर धरावा लागेल. चेहऱ्याद्वारे तुमची ओळख पटली की प्रमाणपत्र तयार होईल. दूरवर राहणाऱ्या पेन्शनधारकांना या सुविधेचा सर्वाधिक फायदा होणार आहे. आता त्यांना बँकेत हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. या सुविधेमुळे कोणत्याही अडचणीशिवाय पेन्शनचे नियमित पेमेंट मिळू शकणार आहे. लवकरच इतर सरकारी विभागतही ही योजना लागू करण्याची शक्यता आहे.