नवी दिल्ली - भारतीय रेल्वेच्या प्रवासी वाहतूक कोचमधून आजपर्यंत प्रवासीच प्रवास करत असल्याचं आपण पाहिलं असेल. माल वाहतुकीसाठी रेल्वेच्या मालगाड्यांमधून वाहतूक करण्यात येते. पण, रेल्वेच्या एसी कोचमधून चक्क चॉकलेट आणि नुडल्सची वाहतूक करण्यात आली आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी डिव्हीजनच्या विभागातून रेल्वेतून ही वाहतूक करण्यात आली आहे.
हुबळी डिव्हीजनच्या गोव्यातील वास्को दा गामा रेल्वे स्टेशनहून दिल्लीला चॉकलेट, नुडल्स आणि खाद्यपदार्थ पोहोचविण्याचं काम रेल्वेच्या एसी कोचमधून करण्यात आलं आहे. या सामानाला एका विशिष्ट तापमानातून पाठवणे आवश्यक होते, अन्यथा ते खराब झाले असते. त्यामुळेच, रेल्वेनं एका नुडल्स आणि चॉकलेटच्या सुरक्षीत वाहतुकीसाठी रेल्वेच्या एसी कोचचा वापर केला.
13 लाख रुपयांची कमाई
रेल्वेनं जवळपास 163 टन चॉकलेट आणि नुडल्स पाठवलं होतं. हे सर्व सामान रेल्वेच्या एसी कोचमधून वास्को द गामा स्टेशनहून दिल्लीत पाठविण्यात आलं. एवीजी लॉजिस्टीक पद्धतीचा हा माल होता. जवळपास 2115 किलो मीटरचं अंतर पार करून ही रेल्वे मोक्याच्या ठिकाणी पोहोचली. रेल्वेने एसी कोचमध्ये या सामान वाहतुकीच्या माध्यमातून 12.83 लाख रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या बेकार पडलेल्या एसी डब्यातून ही वाहतूक करण्यात आली आहे.
ऑक्टोबर 2020 पासून आत्तापर्यंत हुबळी डिव्हीजनने पार्सलच्या ट्रान्सपोर्ट माध्यमातून 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. सप्टेंबर 2021 मध्येच हुबळी डिव्हीजनने याप्रकारे 1.58 कोटी रुपये कमावले आहेत.