इंदूर - ऐनवेळी आलेल्या अडचणींमुळे अनेकांना आरक्षण असूनही प्रवासाचा बेत रद्द करावा लागतो. अशावेळी तिकीट रद्द करताना रेल्वेकडून ठरावीक शुल्क आकारले जाते. मात्र अशा रद्द करण्यात येणाऱ्या तिकिटांवर आकारण्यात येणाऱ्या शुल्कामधून रेल्वेला हजारो कोटी रुपयांची कमाई होत असल्याचे माहितीच्या अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीमधून समोर आले आहे. भारतीय रेल्वेने 2018-19 या काळात आरक्षित आणि अनारक्षित तिकिटे रद्द करण्यावर आकारण्यात आलेल्या शुल्कामधून तब्बल 1 हजार 536 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आरक्षित तिकिटे रद्द करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामधून रेल्वेला किती कमाई होते हे जाणून घेण्यासाठी मध्य प्रदेशमधील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. त्याला रेल्वेकडून उत्तर देण्यात आले असून, आरक्षित तिकीटे रद्द करण्यासाठी आकारण्यात आलेल्या शुल्कामधून रेल्वेला 1 हजार 518. 62 कोटी आणि यूटीएसमधून खरेदी केलेली तिकिटे रद्द करण्यामधून 18.23 कोटी रुपयांची कमाई झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र रद्द करण्यात येणाऱ्या तिकिटांसाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्याचा विचार रेल्वे करत आहे का, अशी विचारणाही चंद्रशेखर गौड यांनी केली होती. मात्र रेल्वेकडून या प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले नाही. दरम्यान, व्यापक जनहित विचारात घेऊन तिकीट रद्द करण्याच्या बदल्यात प्रवाशांकडून वसूल करण्यात येणारे शुल्क घटवले पाहिजे, अशी मागणी गौड यांनी केली आहे.
रद्द केलेल्या तिकिटांवरील शुल्कातून रेल्वेची चांदी, केली हजारो कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 7:45 PM