Join us  

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रात्रीच्यावेळी प्रवास करत असाल तर जाणून घ्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 7:01 PM

Indian Railways : भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे सेवांपैकी एक आहे. भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात.

नवी दिल्ली : ट्रेनने प्रवास  (Train Travel) करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुम्हीही ट्रेनने लांब प्रवास करण्याचा विचार करत असाल, म्हणजेच तुम्ही रात्री प्रवास करण्याचाही विचार करत असाल तर आता रात्रीच्या प्रवासाच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. रात्रीच्या प्रवासात अनेकवेळा प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते, त्यामुळे यावर मात करण्यासाठी रेल्वेने नियमात बदल केले आहेत.

अनेक वेळा रात्री ट्रेनमध्ये प्रवास करताना  (Indian Railway Rules For Sleeping) तुमच्या आजूबाजूला असलेले प्रवासी फोनवर मोठ्याने बोलतात किंवा चित्रपट पाहतात व गाणी ऐकतात, यामुळे लोकांना खूप त्रास होतो. त्यामुळे अशा समस्या दूर करण्यासाठी रेल्वेने विशेष निर्णय घेतला आहे.यापुढे रात्रीच्या वेळी प्रवास करताना असे कृत्य कोणी केल्यास दंड आकारला जाईल, असे रेल्वेने सांगितले आहे. रात्रीच्या वेळी कोचच्या आत आणि बाहेर आवाज करणे, कोचमधील इतर लोकांशी मोठ्याने बोलणे, मोठ्या आवाजात गाणी लावणे किंवा अशा प्रकारे फोनवर बोलणे, यासाठी रेल्वेकडून मोठा दंड वसूल केला जाईल. रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्ही इअरफोन लावून चित्रपट पाहू शकता किंवा गाणी ऐकू शकता पण इअरफोनशिवाय अशी कोणतीही कामे करू शकत नाही. प्रवाशांना सहज झोपता यावे आणि कोणताही त्रास न होता प्रवास करता यावे, यासाठी रेल्वेने हा नवा नियम आणला आहे.

TTE सुद्धा उठवू शकत नाहीअनेक वेळा असे घडते की, ट्रॅव्हल तिकीट एग्झामिनर (TTE) रात्री उशिरापर्यंत प्रवाशाला उठवतात आणि तिकीट किंवा आयडीबद्दल विचारतात. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, TTE तुम्हाला रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत त्रास देऊ शकत नाही. फक्त सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतच तिकिटांची पडताळणी करता येईल. रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, TTE देखील झोपताना तुमचे तिकीट तपासू शकत नाही. मात्र, रात्री 10 नंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा नियम लागू होणार नाही. जर तुम्ही रात्री 10 नंतर ट्रेनमध्ये बसलात तर तुम्हाला तिकीट आणि ओळखपत्र दाखवले पाहिजे.

दररोज लाखो लोक रेल्वेने करतात प्रवास भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे सेवांपैकी एक आहे. भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणे खूप सोपे आणि स्वस्त देखील आहे. रेल्वे ही देशातील गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांसाठी प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोक रेल्वेला प्राधान्य देतात. 

टॅग्स :भारतीय रेल्वेरेल्वे