Join us

Indian Railways : रेल्वेने खाद्यपदार्थांच्या मेनूमध्ये केला बदल; उद्यापासून ट्रेनमध्ये मिळणार 'हे' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 12:30 PM

Indian Railways : रेल्वे प्रवाशांना आता प्रवासात प्रादेशिक खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत.

नवी दिल्ली : प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेकडून दरवेळी नव-नवीन सुविधा सुरू केल्या जातात. रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या या सुविधा ऐकून तुम्हालाही आनंद होईल. दरम्यान, रेल्वे बोर्डाने ट्रेनमध्ये उपलब्ध जेवणाच्या मेनूमध्ये बदल केले आहेत. रेल्वे प्रवाशांना आता प्रवासात प्रादेशिक खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत. लिट्टी-चोख्यापासून इडली-सांबारपर्यंत या पदार्थांमध्ये सर्व्ह केले जाईल. याशिवाय, ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या जैन समाजाच्या लोकांसाठी शुद्ध शाकाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

याचबरोबर, आता मधुमेहाचा त्रास असलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये उकडलेल्या भाज्या आणि ओट्सही दिले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय संपूर्ण धान्य-2023 वर्षाच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे बोर्डाने ट्रेनमध्ये उपलब्ध खाद्यपदार्थांच्या मेनूमध्ये भरड धान्याच्या आठ डिशचा समावेश केला आहे. नव्या बदलानंतर ट्रेनमध्ये बाळाच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या आदेशानुसार, राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि वंदे भारत या सर्व प्रीमियम ट्रेनमध्ये उद्यापासून म्हणजेच 26 फेब्रुवारीपासून हा बदल लागू होईल.

रेल्वे बोर्डाने ट्रेनमध्ये उपलब्ध खाद्यपदार्थांच्या मेनूमध्ये तीन वर्षांहून अधिक काळानंतर बदल केला आहे. यापूर्वी 2019 मध्ये, रेल्वेने ट्रेनच्या कॅटरिंग मेनूमध्ये बदल केला होता. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उद्यापासून रेल्वे प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रादेशिक लोकप्रिय पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. लिट्टी-चोखा, इडली-सांभार, डोसा, बडा पाव, पावभाजी, भेळपुरी, खिचडी, झालमुडी, व्हेज-नॉन-व्हेज मोमोज, स्प्रिंग रोल आदी प्रादेशिक पदार्थ ट्रेनमध्ये मिळतील.

जैन समाजातील प्रवाशांना कांदा-लसूणशिवाय जेवण दिले जाणार आहे. जर एखाद्याला मधुमेहाचा त्रास असेल तर तो उकडलेल्या भाज्या, मिल्क-ओट्स, मिल्क-कॉर्न फ्लेक्स, अंड्याचा पांढरा ऑम्लेट इत्यादी घेऊ शकतो. ट्रेनमध्ये शुगर फ्री चहा-कॉफीही मिळणार आहे. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांच्या शौकीन प्रवाशांना नाचणीचे लाडू, नाचणी कचोरी, नाचणी इडली, नाचणी डोसा, नाचणी पराठा, नाचणी उपमा मिळेल.

टॅग्स :आयआरसीटीसीरेल्वेअन्न