Join us

Bullet Train Ticket Price : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भाडे किती असेल? स्वत: रेल्वेमंत्र्यांनी दिलं उत्तर; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 3:59 PM

Bullet Train Ticket Price : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुरतलाही भेट दिली होती

नवी दिल्ली : देशातील पहिली बुलेट ट्रेन (Bullet Train) मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. त्यासाठी तयारीही जोरात सुरू आहे. देशातील जनता सुद्धा बऱ्याच दिवसांपासून बुलेट ट्रेन धावण्याची वाट पाहत आहे. दरम्यान, बुलेट ट्रेनचा प्रवास किती महाग असणार? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. तुमचाही प्रश्न असाच असेल, तर खुद्द रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw)यांनीच एका कार्यक्रमात याचे उत्तर दिले आहे.

एका कार्यक्रमादरम्यान रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, बुलेट ट्रेनचे संचालन 2026 पासून सुरू होईल. प्रवाशांच्या सोयीसाठी सरकार सातत्याने काम करत असल्याचे ते म्हणाले. सरकारने या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. कार्यक्रमादरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही बुलेट ट्रेनच्या भाड्याबाबत संकेत दिले होते. भाड्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण ते लोकांच्या आवाक्यात असेल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. 

फर्स्ट एसी बनणार बुलेट ट्रेनच्या भाड्याचा आधारबुलेट ट्रेनच्या भाड्यासाठी फर्स्ट एसी हा आधार बनवला जात आहे, जो जास्त नाही, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. यावरून बुलेट ट्रेनचे भाडे फर्स्ट एसीच्या बरोबरीचे असेल हे स्पष्ट झाले आहे. तसेच, बुलेट ट्रेनचे भाडे विमानापेक्षा कमी असेल आणि त्यात सुविधाही चांगल्या असतील, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. मात्र, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच भाडेवाढीबाबतच्या फाइलचा निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान,  मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच दुसरा हायस्पीड रेल्वे प्रकल्प सुरू होईल.

रेल्वेमंत्र्यांनी स्वतः घेतला प्रकल्पाचा आढावा अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुरतलाही भेट दिली होती. सरकारने 2026 मध्ये सूरत ते बिलीमोरा दरम्यान पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये चांगली प्रगती होत असून तोपर्यंत आम्ही रेल्वे धावण्याचे काम पूर्ण करू असा विश्वास आहे, असे ते म्हणाले होते. मुंबई ते अहमदाबाददरम्यान ताशी 320 किमी वेगाने बुलेट ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव आहे. दोन्ही शहरांमध्ये एकूण 508 किमी अंतर असून त्यात 12 स्थानके असतील. या ट्रेनमुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ तीन तासांवर कमी होणार आहे. सध्या सहा तास लागतात. या प्रकल्पाची एकूण अंदाजे किंमत 1.1 लाख कोटी रुपये आहे.

टॅग्स :अश्विनी वैष्णवरेल्वेबुलेट ट्रेन