नवी दिल्ली - लालूप्रसाद यादव यांनी सुरु केलेली गरीब रथ एक्सप्रेस आता बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी हमसफर एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे. या निर्णयामुळे गरीबांचा आरामदायी प्रवास बंद होणार असून नवीन प्रवास महागणार आहे. या रेल्वेतून थ्री टियर एसी प्रवास कमी दराने करण्यात येत होता. या महिनाअखेरपासून हा निर्णय लागू करण्यात येईल, अशी माहिती आहे.
सर्वप्रथम दिल्ली-चेन्नई रेल्वे मार्गावर चालणारी रेल्वेगाडी बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या मार्गावरीलही या गाडीचे आगमन बंद करण्यात येईल. रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार दक्षिण भारत आणि नॉर्थर्न झोन कार्यालयास याबाबत सूचना देण्यात आली आहे. 29 सप्टेंबरपासून गरीब रथ रेल्वेचे बुकिंग बंद करण्याचेही या आदेशात म्हटले आहे.
गरीब रथ एक्सप्रेसचे डब्बे जुने झाले असून या डब्ब्यांची आता दुरुस्ती शक्य नाही. त्यामुळे ही एक्सप्रेस बंद करुन त्याऐवजी हमसफर एक्सप्रेस नव्याने सुरू करण्यात येईल, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले आहे. दिल्ली-चेन्नई मार्गावर धावणाऱ्या हमसफर एक्सप्रेससाठी पहिले दोन महिने गरीब रथ एक्सप्रेसप्रमाणेच भाडे आकारले जाईल. मात्र, डिसेंबरपासून नवीन भाडे आकारणी केली जाणार आहे. दरम्यान, काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी 2005 साली गरीब रथ एक्सप्रेस सुरू केली होती. मात्र, ही रेल्वेसेवा बंद होणार असल्याने सामान्य प्रवाशांच्या खिशावर दुप्पट भाडे आकारणीचा भार पडणार आहे.