नवी दिल्ली : वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी भारतीय रेल्वेकडून एक खुशखबर देण्यात आली आहे. माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांचा प्रवास आता पूर्वीपेक्षा सुकर होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी कटरापर्यंतची रेल्वे सेवा मोदी सरकारकडून सुरू करण्यात आली होती. 2019 मध्ये नवी दिल्ली ते कटरा ही वंदे भारत एक्सप्रेस सर्वात कमी वेळेत सुरू झाली.
अलीकडेच, रेल्वेने चेन्नई आणि दिल्ली ते कटरा या विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय, रेल्वेने चेन्नईहून धावणारी 'श्री माता वैष्णो देवी कटरा-चेन्नई एक्स्प्रेस' (Chennai-Mata Vaishno Devi Katra Express) आणि दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावरून धावणारी हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम सुपरफास्ट (Ernakulam Hazrat Nizamuddin SF Express) ही ट्रेनही सुरू केली आहे.
रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, ट्रेन क्रमांक 22655/22656 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस आणि 16031/16032 चेन्नई सेंट्रल-श्रीमाता वैष्णो देवी कटरा-चेन्नई सेंट्रल पूर्ववत करण्यात आली आहे. 6 जुलैपासून ट्रेन क्रमांक 22655 सुरू होत आहे आणि 8 जुलै 2022 पासून ट्रेन क्रमांक 22656 सुरू होत आहे.
चेन्नई सेंट्रल - श्री माता वैष्णो देवी कटरा आठवड्यातून दोनदा अप आणि दोनदा डाऊन चालविण्यात येणार आहे. याआधी 3 जुलै 2022 पासून ट्रेन क्रमांक 16031 सुरू करण्यात आली आहे. ती आठवड्यातून तीन दिवस चालणार आहे. डाऊन दिशेतील ट्रेन क्रमांक 16032 ने 5 जुलै 2022 पासून यात्रेकरूंना आपली सेवा देणे सुरू केले आहे.
दरम्यान, दोन्ही ट्रेन पूर्ववत झाल्यामुळे केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, जम्मू, पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आदी राज्यांतून येणाऱ्या भाविकांना फायदा होणार आहे. तसेच, कटरा ते भवन हा प्रवास सुकर करण्यासाठी रोपवेची सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची बातमी यापूर्वी आली होती. कटरा ते अर्ध कुंवरी दरम्यान हा रोपवे सुरू होईल. कटरा ते अर्ध कुंवरी या रोपवेची लांबी 1,281 मीटर असेल.