भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी सातत्याने नवनवीन सुविधा सुरू करताना दिसत आहे. आता रेल्वे गाड्यांमध्ये एका विशेष सीटची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, लहान मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांना या सीटचा मोठा फायदा होईल. रेल्वे लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी, एका सीटवर विशेष बर्थ देणार आहे. या बर्थला 'बेबी बर्थ' (Baby Berth) म्हटले जात आहे. (Baby Berth in Indian Railway)
मदर्स डे निमित्त रेल्वेची भेट -
उत्तर रेल्वेच्या लखनौ रेल्वेने मदर्स डे (Mothers Day) निमित्त महिलांना ही नवी भेट दिली आहे. लखनौहून नवी दिल्लीला जाणाऱ्या मेलमध्ये सोमवारी या सुविधेची सुरुवात करण्यात आली. रेल्वेने पायलट प्रोजेक्टच्या धरतीवर रेल्वेच्या AC-3 कोचमध्ये दोन सीट्सवर हे बेबी बर्थ लावले आहेत.
महिलांना मिळणार मोठी मदत -
या बेबी बर्थचे फोटोही समोर आले आहेत. हे बेबी बर्थ नॉर्मल सीटलाच जोडण्यात आले आहे. बेबी बर्थमुळे महिलांना सीटवर अधिक जागा मिळेल. यावर महिला आपल्या मुलाला अगदी सहजपणे झोपवू शकतील. महत्वाचे म्हणजे, या बेबी बर्थच्या कॉर्नरला एक स्टॉपर लावण्यात आले आहे. यामुळे मूल खाली पडण्याची भीतीही नसेल.
फोल्डेबल आहे सीट -
हे सीट फोल्ड देखील होऊ शकते, ही या बेबी बर्थची खासियत आहे. म्हणजेच, जेव्हा याची आवश्यकता नसेल, तेव्हा हे सीट फोल्ड करून सीटखालीही टाकले जाऊ शकते. ये सीट केवळ ट्रेनच्या लोअर सीटलाच जोडण्यात आले आहे. खरे तर, रेल्वेने हे बर्थ सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू केले असून, ते सध्या एकाच रेल्वेत लावण्यात आले आहे. अद्याप रेल्वेने यासंदर्भात अधिक माहिती दिलेली नाही.