Join us

Indian Railways : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! आता प्रवासात खाद्यपदार्थ नेण्याची झंझट संपली, आजपासून 'ही' सुविधा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 1:04 PM

Indian Railways : आजपासून म्हणजेच 14 फेब्रुवारीपासून आयआरसीटीसी (IRCTC) सर्व ट्रेनमध्ये प्रवाशांना खाद्यसेवा पुरवणार आहे.

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठीही आनंदाची बातमी आहे. आजपासून म्हणजेच 14 फेब्रुवारीपासून आयआरसीटीसी (IRCTC) सर्व ट्रेनमध्ये प्रवाशांना खाद्यसेवा पुरवणार आहे. याबाबतची माहिती रेल्वेकडून (Indian Railways) देण्यात आली आहे. 

भारतीय रेल्वेमध्ये आयआरसीटीद्वारेच खाद्यसेवा पुरवली जाते. आयआरसीटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन आणि देशभरातील कोरोना लॉकडाउन निर्बंध कमी करत ट्रेनमध्ये अन्न शिजवून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सज्ज झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्च 2020 रोजी खाद्यसेवा बंद करण्यात आली होती.

रेल्वे बोर्डाकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रवाशांचे आरोग्य लक्षात घेऊन शिजवलेले अन्न पुन्हा सुरू करण्याचा निर्णय अत्यंत सावधगिरीने घेण्यात आला आहे. आतापर्यंत 80 टक्के गाड्यांमध्ये खाद्यसेवा सुरू करण्यात आली आहे. आता ती १०० टक्के क्षमतेनं सुरू करण्यात येणार आहे. आयआरसीटीसीद्वारे दिवसभरात लाखो लोकांना खाद्यसेवा पुरवली जाते.

आयआरसीटीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही सेवा रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 428 ट्रेनमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली होती. तर 21 डिसेंबरपर्यंत एकूण संख्येच्या 30 टक्के ही सेवा सुरू करण्यात आली होती. 22 जानेवारीपर्यंत 80 टक्के आणि 20 टक्के उर्वरित सेवा ही 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत सुरू केली जाणार आहे. राजधानी, शताब्दी, दुरंतोसारख्या प्रीमिअम ट्रेन्समध्ये ही सेवा यापूर्वीच सुरू करण्यात आली होती.

23 मार्च 2020 रोजी कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून खाद्यसेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी घट पाहता काही कालावधीनंतर ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रोटोकॉलमुळे ट्रेनमध्ये शिजवलेलं अन्न देणे बंद करण्यात आले होते. त्यामुले खासगी कंपन्यांद्वारे प्रवाशांना खाद्यसेवा पुरवली जात होती. इतकंच नाही, तर पेंट्रीकारमध्येही अन्न शिजवण्यास मनाई करण्यात आली होती. यामुळे रेल्वेलाही मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. परंतु आता सेवा पूर्ववत केल्यामुळे प्रवाशांना गरम आणि दर्जेदार जेवणाचा आनंद घेता येणार आहे.

टॅग्स :रेल्वेआयआरसीटीसीअन्न