नवी दिल्ली : तुमच्याकडे रेल्वेचे कन्फर्म रिजर्व्हेशन तिकीट आहे, पण तुम्ही काही कारणास्तव प्रवास करू शकणार नाही. अशावेळी तुमच्या तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत. कारण तुम्ही ही तिकिटे तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला ट्रान्सफर करू शकता. रेल्वेने ही विशेष सुविधा दिली आहे.
रेल्वे प्रवाशांना अनेकदा या समस्येचा सामना करावा लागतो की, तिकीट बुक केल्यानंतर ते प्रवास करू शकत नाहीत, अशा परिस्थितीत एकतर त्यांना तिकीट रद्द करावे लागते आणि त्यांच्या जागी पाठवलेल्या व्यक्तीला नवीन तिकीट घ्यावे लागते. मात्र, यानंतर कन्फर्म तिकीट मिळणे खूप अवघड असते. त्यामुळेच रेल्वेने प्रवाशांना ही सुविधा दिली आहे. दरम्यान, ही सुविधा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे, परंतु लोकांना याबद्दल फारच कमी माहिती आहे. रेल्वेच्या या सुविधेचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
एखादा प्रवासी त्याचे कन्फर्म केलेले तिकीट त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य जसे की वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांच्या नावावर ट्रान्सफर करू शकतो. यासाठी प्रवाशाला ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी विनंती करावी लागेल. यानंतर, तिकिटावरील प्रवाशाचे नाव कापले जाते आणि ज्या सदस्याच्या नावावर तिकीट ट्रान्सफर केले गेले आहे, त्याचे नाव तिकिटावर दिले जाते.
24 तास अगोदर द्यावा लागतो अर्ज
जर प्रवासी सरकारी कर्मचारी असेल आणि आपल्या ड्युटीसाठी जात असेल तर तो ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी विनंती करू शकतो, ज्या व्यक्तीसाठी विनंती केली आहे, त्याच्या नावावर हे तिकीट ट्रान्सफर केले जाईल. लग्नाला जाणाऱ्या लोकांसमोर अशी परिस्थिती आल्यास लग्न आणि पार्टीच्या आयोजकांना आवश्यक कागदपत्रांसह 48 तास आधी अर्ज करावा लागतो. ही सुविधा तुम्ही ऑनलाइनही मिळवू शकता. ही सुविधा एनसीसी कॅडेट्ससाठीही उपलब्ध आहे.
फक्त एकदाच मिळते संधी
भारतीय रेल्वेचे म्हणणे आहे की, तिकिटांचे ट्रान्सफर फक्त एकदाच केले जाऊ शकते. म्हणजे, जर प्रवाशाने आपले तिकीट दुसर्या व्यक्तीला एकदा ट्रान्सफर केले असेल तर तो ते बदलू शकत नाही. म्हणजेच आता हे तिकीट इतर कोणालाही ट्रान्सफर केले जाऊ शकत नाही.
ट्रेनचे तिकीट कसे ट्रान्सफर करावे?
1. तिकिटाची प्रिंट काढा.
2. जवळच्या रेल्वे स्टेशनच्या रिजर्व्हेशन काउंटरला भेट द्या.
3. ज्यांच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करायचे आहे, त्यांचे ओळखपत्र जसे की आधार किंवा मतदान कार्ड घेऊन जावे लागेल.
4. यानंतर काउंटरवर तिकीट ट्रान्सफरसाठी अर्ज करावा लागेल.