लोकमत न्यूज नेटवर्क | नवी दिल्ली
डिसेंबर २०१४ पासून आतापर्यंत रुपया सुमारे २५ टक्क्यांनी घसरला, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिली. सध्या रुपयाची जी घसरण सुरू आहे, त्यास रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्षासारखे जागतिक घटक कारणीभूत आहेत, असेही सीतारामन यांनी सांगितले.
अनिवासी भारतीयांसाठी रुपया अधिक आकर्षक
सीतारामन यांनी सांगितले की, विदेशी चलन बाजारावर रिझर्व्ह बँकेचे लक्ष असते. जेव्हा अस्थिरता जास्त वाढते, तेव्हा रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करीत असते. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच व्याज दरात वाढ केली आहे. त्यामुळे अनिवासी भारतीयांसाठी रुपया अधिक आकर्षक झाला आहे.
आठवडाभरापासून सातत्याने घसरण
- मागील आठवडाभरापासून रुपया सातत्याने घसरत आहे. यासंदर्भातील प्रश्नावर सीतारामन यांनी सांगितले की, रशिया-युक्रेन युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि कठोर होत चाललेली जागतिक वित्तीय स्थिती यामुळे सध्याची रुपयाची घसरण होत आहे.
- डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असला तरी इतर जागतिक चलनांच्या तुलनेत रुपया मजबूत होताना दिसत आहे.
- डॉलरच्या तुलनेत ब्रिटिश पाउंड, जपानी येन आणि युरोपीय युरो यांची रुपयापेक्षा अधिक घसरण झाली आहे. २०२२ मध्ये या चलनांच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे.
घसरत्या रुपयाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?
चलनातील चढ-उतार हा अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अनेक घटकांपैकी केवळ एक घटक आहे. रुपयातील घसरणीमुळे निर्यात वाढण्याची शक्यता आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. चलनातील घसरणीमुळे आयात मात्र महाग होते.
- एचडीएफसी सेक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत मंगळवारी सोने ६ रुपयांनी वाढून ५०,२९० रुपये प्रती १० ग्रॅम झाले.
- चांदी मात्र १३७ रुपयांनी घसरून ५५,५३९ रुपये प्रती किलो झाली. जागतिक बाजारात सोने वाढून १,७११ डॉलर प्रती औंस झाले. चांदी १८.८० डॉलर प्रती औंस स्थिर राहिली.
- शेअर बाजारात मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४६.४७ अंकांनी वाढून ५४,७६७.६२ अंकांवर बंद झाला.
- राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६२.०५ अंकांनी वाढून १६,३४०.५५ अंकांवर बंद झाला. ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, महिंद्रा, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, आदी कंपन्यांचे समभाग वाढले.
लेखी उत्तरात सीतारामन यांनी सांगितले की... ३१ डिसेंबर २०१४ रोजी एक डॉलरची किंमत ६३.३३ रुपये होती. ११ जुलै २०२२ रोजी ती ७९.४१ रुपये झाली. ही घसरण २५ टक्के आहे.
मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ६ पैशांनी घसरला. त्याबरोबर एक डॉलरची किंमत ७९.९२ रुपये झाली. तत्पूर्वी रुपया इंट्रा-डे स्पॉट व्यवहारांत घसरून प्रथमच ८०.५ वर गेला होता. मात्र, त्यानंतर त्यात थोडी सुधारणा झाली आणि तो ८० च्या खाली बंद झाला.