Join us

भारतीय केशराचा जगात धुमाकूळ; एक किलो केशर ४.९५ लाख रुपयांना, उत्पादक मालामाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 10:21 AM

या हिशेबाने एक किलो केशरची किंमत जवळपास ७० ग्रॅम सोन्याच्या बरोबर झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांनी भारताच्या काही कंपन्यांच्या मसाल्यावर बंदी घातली तरी भारताचा एक मसाला सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. हा मसाला म्हणजे ‘केशर’! भारतीय केशरची जागतिक बाजारातील किंमत तब्बल ४.९५ लाख रुपये किलो झाली आहे. शुक्रवारी सोन्याची किंमत ७२,६३३ रुपये प्रति १० ग्रॅम होती. या हिशेबाने एक किलो केशरची किंमत जवळपास ७० ग्रॅम सोन्याच्या बरोबर झाली आहे.

पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणहून आयात होणाऱ्या केशरच्या पुरवठ्यात बाधा उत्पन्न झाली आहे. त्यामुळे भारतीय केसर उत्पादक आणि व्यापारी यांची चांदी झाली आहे. 

युद्धामुळे भाव आणखी वाढले

जाणकारांनी सांगितले की, पश्चिम आशियातील संघर्ष सुरू होण्याआधी भारतीय केशरची घाऊक बाजारातील किंमत २.८ लाख ते ३ लाख रुपये किलो होती. ती आता वाढून ३.५ लाख ते ३.६ लाख रुपये किलो झाली आहे. किरकोळ बाजारात ही किंमत ४.९५ लाख रुपये आहे.

सर्वाधिक केशर उत्पादन  कोणत्या देशात?

भारतात जम्मू-काश्मीरच्या काही भागांत केशरचे पीक घेतले जाते. भारतीय केशरच्या किमतीत मागील काही महिन्यांत घाऊक बाजारात २० टक्क्यांपेक्षा अधिक, तर किरकोळ बाजारात २७ टक्के वाढ झाली आहे. केशर हा जगातील सर्वाधिक महागड्या मसाल्यांपैकी एक आहे.

श्रीनगरच्या अमीन-बिन-खालिक कंपनीचे मालक नूर उल अमीन बिन खालिक यांनी सांगितले की, इराणमध्ये दरवर्षी ४३० टन केशर उत्पादन होते. 

जगातील एकूण केशर उत्पादनाच्या ते ९० टक्के आहे. जम्मू-काश्मिरात अवघे ३ टन केशर उत्पादन होते. मागील १३ वर्षांत येथील केशर उत्पादनात मोठी घट झाली आहे.

 

टॅग्स :जम्मू-काश्मीर