नवी दिल्लीः लाभांश वितरण कर (डीडीटी) संपवणं, कंपन्यांची चांगली कामगिरी आणि अमेरिकी-चीनमध्ये भडकलेल्या व्यापार युद्धातून काहीसा दिलासा मिळाल्याच्या कारणास्तवर सेन्सेक्सनं आज 40 हजारांचा टप्पा पार केला आहे. सकाळी 10.34 वाजता मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 187.84 अंक म्हणजे 0.47 टक्के वाढून 40,019.68 स्तरावर पोहोचला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीसुद्धा 55.30 अंक म्हणजेच 0.47 टक्के वाढीनंतर 11842.15वर पोहोचला. तत्पूर्वी शेअर बाजार 39,969.68 स्तरावरच उघडला होता. त्यानंतर सेन्सेक्समध्ये 137.84 अंकांची म्हणजेच 0.35 टक्के वाढ होऊन तो 40 हजारांच्या पार गेला आहे.तर निफ्टीतही 59 अंक म्हणजेच 0.50 टक्के वाढीनंतर 11845.85 स्तरावर उघडला. भारती एअरटेल, ग्रासीम, आयओसी, इन्फोसिस, इन्फ्राटेल, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, येस बँक आणि विप्रोच्या शेअर्सनं उसळी घेतली होती, तर टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, बीपीसीएल, पॉवर ग्रीड, सिप्ला, रिलायन्स, एम अँड एम आणि एनटीपीसीच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली आहे.सकाळी 9.14 वाजता शेअर मार्केट हिरव्या निशाणावर होता. त्यावेळी सेन्सेक्समध्ये 223.79 अंक म्हणजेच 0.56 टक्के वाढ झाली होती, त्यामुळे सेन्सेक्स 40055.63च्या स्तरावर पोहोचला होता. तर निफ्टीतही 97.05 अंक म्हणजेच 0.82 टक्के वाढीसह 11883.90 स्तरावर पोहोचला आहे. मंगळवारी सेन्सेक्स 582 अंकांनी मजबूत होऊन बंद झाला होता. बाजारात चहूबाजूंनी खरेदीचा उत्साह होता. वाहन कंपन्यांचे शेअर्सही निफ्टीत हिरव्या निशाणावर बंद झाले होते.
शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स 40 हजारांच्या पार, निफ्टीतही उसळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 11:43 AM