मुंबई : गेल्या काही वर्षांत प्रचंड गाजावाजा झालेल्या देशातील स्टार्टअप कंपन्यांना सध्या उतरती कळा लागली असून, हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. या कंपन्यांच्या नफ्यात मोठी घट झाली असून, खर्च मात्र प्रचंड वाढला आहे. याच वेळी मंदीच्या भीतीने स्टार्टअप्सना निधी मिळण्याचा मार्ग अधिक कठीण झाला असल्याने स्टार्टअप कंपन्या मोठ्या संकटात आहे.
आकडेवारीनुसार, देशातील सर्वच स्टार्टअप्स नफ्यात येण्यासाठी सतत संघर्ष करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून ते जून २०२२ पर्यंत १०० दशलक्ष डॉलर किंवा त्याहून अधिक निधी उभारणाऱ्या ५७ स्टार्टअपपैकी केवळ ३.५ टक्के स्टार्टअप नफा कमावत आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत नफ्याचे प्रमाण तब्बल २९.२ टक्के होते. व्हेंचर इंटेलिजन्सने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण ५७ कंपन्यांनी जानेवारी-जून २०२२ या कालावधीत १०० दशलक्ष डॉलर किंवा त्याहून अधिक रकमेची उभारणी केली.
किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढले?
एका अहवालानुसार, देशातील २७ स्टार्टअप कंपन्यांनी या वर्षी तब्बल १०,०२९ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. कामावरून काढून टाकणाऱ्या कंपन्यांमध्ये कार्स २४, ओला, मिशो, एमपीएल, एनअकॅडमी, बायजूस आणि वेदांतूसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
सर्वात जास्त कर्मचारी कपात ही ग्राहक सेवा स्टार्टअप्समध्ये झाली आहे, त्यानंतर ई-कॉमर्स आणि एज्युकेशन स्टार्टअप्स यांचा समावेश आहे.
कुठे आहेत संधी?
व्हेंचर इंटेलिजन्सच्या मते, देशात निधी उभारणीचे आणि स्टार्टअप उभारणीचे काम अजूनही सुरूच आहे. २०२१ मध्ये २५० व्यावसायिकांनी गुंतवणुकीसाठी मोठा निधी उभारला. २०२० मध्ये केवळ १४२ व्यावसायिकांनी निधी उभारला होता. २०१५ ते २०२१ दरम्यान ई-कॉमर्स हा सर्वात लोकप्रिय उद्योग होता, त्यानंतर सास, फिनटेक, हेल्थकेअर (हेल्थटेकसह), आणि अन्न आणि पेये या क्षेत्रात स्टार्टअप उघडली गेली जात आहेत.
फटका कशामुळे?
जगभरात मंदीचे सावट
वाढती महागाई
सतत वाढत असलेला खर्च
व्याजदरांमध्ये होत असलेली वाढ
शेअर बाजारामध्ये घसरण
रशिया-युक्रेन युद्ध
देशातील प्रमुख स्टार्टअप
फार्मइझी | डिजिट इन्शुरन्स | मिशो | ग्रो | नायका | उडाण | ड्रीम११ | स्विगी