Join us  

भारतीय गव्हाला आला सोन्याचा भाव; मागणी वाढली, रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्यातीची मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 7:50 AM

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताच्या गव्हाला परदेशातून मोठी मागणी सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली:  रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताच्या गव्हाला परदेशातून मोठी मागणी सुरू झाली आहे. खरे तर रशिया आणि युक्रेन हे जगातील सर्वात मोठे गहू निर्यातदार आहेत. मात्र युद्धामुळे गव्हाच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भारताकडे खरेदीदारांची चौकशी वाढली आहे.

युक्रेन गेल्या दशकात प्रमुख धान्य निर्यातदार म्हणून उदयास आला आहे. या वर्षी तो तिसऱ्या क्रमांकावर येण्याची अपेक्षा होती, परंतु युक्रेन सैन्याने त्याच्या बंदरावर व्यावसायिक वाहतूक स्थगित केली आहे, ज्यामुळे धान्य आणि तेलबिया निर्यातीवर परिणाम होणार आहे. अशा स्थितीत भारताशिवाय ऑस्ट्रेलियाही गव्हाचा जगातील अव्वल पुरवठादार देश बनू शकतो.

मोठ्या प्रमाणावर चौकशी 

भारताने २०२१ मध्ये ६१.२ लाख टन गव्हाची निर्यात केली होती. आता २०२२ च्या पहिल्या सहामाहीत ४० लाख टन अन्नधान्याची विक्री होण्याची शक्यता आहे.  एका जागतिक व्यापारी संस्थेच्या प्रमुखाने सांगितले की, गेल्या अनेक वर्षांत प्रथमच भारतातून गव्हासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर चौकशी करण्यात आली आहे.

भारत गव्हाचे भंडार

- भारतात गव्हाचा मोठा साठा आहे. मात्र, गव्हाच्या प्रतिकूल जागतिक दरामुळे विक्रीवर परिणाम झाला.

- काळा समुद्राचा पट्टा हा जगातील सर्वात मोठा गव्हाचा पुरवठादार आहे. 

- सध्याची अनिश्चितता पाहता मागणी भारताकडे वळली आहे. शिवाय, जागतिक बाजारपेठेत गव्हाची उपलब्धता मर्यादित आहे आणि भारत या संधीचा सहज फायदा घेऊ शकतो.

भारताचा गहू कोण खरेदी करतो

बांगलादेश, फिलिपिन्स, दक्षिण कोरिया, श्रीलंका, यूएई,लेबनॉन 

टॅग्स :युक्रेन आणि रशियाभारत