Join us

भारतातल्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; यंदा मिळणार 'इतकी' पगारवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 9:05 AM

आशिया पॅसिफिक पट्ट्यात सर्वाधिक पगारवाढ भारतात

ठळक मुद्देयंदा भारतीय कर्मचाऱ्यांना सरासरी १० टक्के पगारवाढ मिळण्याचा अंदाजआशिया पॅसिफिक पट्ट्यात सर्वाधिक पगारवाढ भारतीय कर्मचाऱ्यांना मिळणारपगारवाढीत चीन दुसऱ्या क्रमांकावर, फिलिपिन्स तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली: भारतातल्या नोकरदारांना यंदाच्या वर्षात ९.१ टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. आशिया पॅसिफिक पट्ट्यात येणाऱ्या इतर कोणत्याही देशातल्या नोकरदारांच्या तुलनेत ही पगारवाढ सर्वाधिक असेल. एऑन या मानव संसाधन क्षेत्रातल्या आघाडीच्या कंपनीनं एका अहवालातून यंदाच्या पगारवाढीबद्दलचा अंदाज वर्तवला आहे. यंदा भारतीयांना ९.१ टक्के पगारवाढ मिळेल असा अंदाज आहे. गेल्या दहा वर्षांतली ही सर्वात कमी पगारवाढ असेल. मात्र आशिया पॅसिफिक पट्ट्याचा विचार केल्यास भारतीयांना मिळणारी वेतनवाढ ही सर्वाधिक असेल. सध्या देशात मंदीसदृश्य परिस्थिती असली, तरीही भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला प्राधान्य देऊन पगारवाढ देतील, असं एऑन अहवालात नमूद केलं आहे. गेल्या वर्षी भारतीय कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सरासरी ९.३ टक्के इतकी पगारवाढ दिली होती. यंदा भारतातल्या ३९ टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ देऊ शकतात, असा एऑनचा अंदाज आहे. तर ४२ टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांचा पगार ८ ते १० टक्क्यांनी वाढवू शकतात. वीसपेक्षा जास्त क्षेत्रातल्या एक हजाराहून अधिक कंपन्यांकडून मिळालेल्या आकडेवारीचा आधार घेऊन एऑननं अहवाल तयार केला आहे. ई-कॉमर्स आणि व्यायसायिक सेवा देणाऱ्या कंपन्या यंदा १० टक्के किंवा त्याहून जास्त पगारवाढ देऊ शकतात. औषध उत्पादक कंपन्या यंदा सर्वाधिक वेतनवाढ देण्याची शक्यता आहे. याशिवाय एफएमसीजी आणि केमिकल कंपन्यादेखील पगारात चांगली वाढ देऊ शकतात. '२०१९ मध्ये भारतातल्या कंपन्यांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र तरीही भारतीय कंपन्या पगारवाढीबद्दल सकारात्मक असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच आशिया पॅसिफिक पट्ट्यात वेतनवाढीच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर असेल,' असं एऑनच्या झीटेल फर्नांडिस यांनी सांगितलं. आशिया पॅसिफिक पट्ट्यात येणाऱ्या देशांचा विचार केल्यास पगारवाढीच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर असेल. यानंतर चीनचा (६.३ टक्के) क्रमांक लागेल. यानंतर फिलिपिन्स (५.८ टक्के), मलेशिया (५.३ टक्के), सिंगापूर (३.८ टक्के), ऑस्ट्रेलिया (३.१ टक्के) यांचा क्रमांक असेल.