Cyber Frauds : देशात सायबर गुन्हेगारांचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. धक्कादायक म्हणजे या गुन्ह्याला बळी पडणारे बहुतेक लोक शिक्षित आहेत. सरकारने उपाययोजना करुनही गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आर्थिक फसवणुकीचा आकडा पाहिला तर कोणाच्याही पायाखालची वाळू सरकू शकते. वर्ष २०२४ च्या पहिल्या ९ महिन्यांत सायबर भामट्यांनी भारतीयांना तब्बल ११ हजार ३०० कोटी रुपयांना गंडा घातला आहे. या फसवणुकीत शेअर ट्रेडिंग घोटाळ्याचा सर्वात मोठा वाटा आहे. याद्वारे ४६३६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या वर्षात जवळपास १२ लाख सायबर फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ४५ टक्के तक्रारी कंबोडिया, म्यानमार आणि लाओसमधून आल्या आहेत. तक्रारी न करणाऱ्यांचा आकडाही खूप मोठा आहे.
कंबोडिया-म्यानमार-लाओस केंद्रस्थान
हा डेटा गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने (Indian Cyber Crime Cordination Center) तयार केला आहे. सिटीझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टमच्या (CFCFRMS) आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये सुमारे १.२ दशलक्ष सायबर फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी ४५ टक्के कंबोडिया, म्यानमार आणि लाओस सारख्या दक्षिण पूर्व आशियाई देशांमधून घडल्या आहेत.
३ वर्षात २७,९१४ कोटींची फसवणूक
संस्थेच्या म्हणण्यानुसार, सन २०२१ पासून आतापर्यंत ३० लाखांहून अधिक म्हणजे ३० लाख सायबर फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्यामध्ये नागरिकांना २७,९१४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राप्त झालेल्या जवळपास ३० लाख तक्रारींपैकी २०२३ मध्ये १०.१३ लाख तक्रारी, २०२२ मध्ये ५१४,७४१ तक्रारी आणि २०२१ मध्ये १३५,२४२ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. स्टॉक ट्रेडिंग स्कॅमचा सायबर फसवणुकीत सर्वात मोठा वाटा असल्याचेही यातून समोर आलं आहे. त्याच्याशी संबंधित एकूण २,२८,०९४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यामध्ये लोकांचे ४६३५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गुंतवणुकीवर आधारित घोटाळ्यांच्या १००,३६० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यात लोकांचे ३२१६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. डिजिटल अटकेच्या ६३,४८१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याद्वारे लोकांचे १६१६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
१७००० व्हॉट्सअॅप खाती ब्लॉक
सायबर फसवणुकीच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की या फसवणुकीद्वारे चोरी केलेले पैसे चेक, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC), क्रिप्टो, एटीएम, मर्चंट पेमेंट आणि ई-वॉलेटद्वारे काढले जातात. गेल्या काही वर्षांत, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने सायबर गुन्ह्यांमध्ये वापरलेली ४.५० लाख बँक खाती गोठवली आहेत. भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने दूरसंचार मंत्रालयाच्या सहकार्याने, दक्षिण पूर्व आशियातील १७,००० व्हॉट्सॲप खाती ब्लॉक केली आहेत, जी सायबर गुन्हेगारांशी जोडलेली होती. जेणेकरून परदेशात कार्यरत असलेल्या सायबर गुन्हेगारी नेटवर्कवर हल्ला केला जाऊ शकतो. देशातील डिजिटल सुरक्षेसाठी केंद्र सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली आहे.