नवी दिल्ली : काळा पैसा लपवून ठेवण्यासाठी स्विस बँकांचा सर्वाधिक वापर व्हायचा. मात्र, आता या बँकांकडे भारतीयांनी पाठ फिरविली आहे. स्विस बँकांमध्ये गेल्या वर्षी ३० हजार काेटी रुपये जमा करण्यात आले असून त्यात २०२१च्या तुलनेत ११ टक्के घट झाली आहे. यासंदर्भात स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेने आकडेवारी जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारतीयांच्या जमा रकमेत एकूण ३४ टक्के घट झाली आहे.
स्विस बँकांमध्ये जमा हाेणाऱ्या पैशांमध्ये यापूर्वी सलग दाेन वर्षे वाढ झाली हाेती. जमा रकमेत बँकांच्या भारतातील तसेच इतर वित्तीय संस्थांच्या मार्फत जमा झालेल्या पैशांचा समावेश आहे. २०२१मध्ये स्विस बँकांमध्ये जमा असलेला भारतीयांचा पैसा १४ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पाेहाेचला हाेता. मात्र, आता भाारतीयांनी तेथे पैसे जमा करणे कमी केल्याचे स्पष्ट हाेते.
२००६ मध्ये गाठला उच्चांकस्विस बँकांतील जमा रक्कम २००६ मध्ये सर्वाधिक ६.५ अब्ज स्विस फ्रँक म्हणजे सुमारे ५९ हजार काेटी रुपये जमा हाेते. त्यानंतर २०११, २०१३, २०१७, २०२० आणि २०२१ वर्षांचा अपवाद वगळता स्विस बँकांमध्ये जमा हाेणाऱ्या रकमेत घट नाेंदविण्यात आली.
काळ्या पैशांचा उल्लेख नाहीभारतीयांनी जमा केलेला पैसा काळा पैसा आहे अथवा नाही, याबाबत अहवालात काेणताही उल्लेख केलेला नाही. याशिवाय तिसऱ्या देशाच्या माध्यमातून स्विस बँकांत भारतीयांनी पैसा जमा केला आहे का, याचाही उल्लेख नाही.