अनेकदा बऱ्याच जणांचा आवश्यक वस्तूंवर खर्च करण्यापेक्षा चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल असतो. अशा स्थितीत आपल्यावर आर्थिक भार इतका वाढतो की आपल्याला आवश्यक गोष्टींवर खर्च करता येतनाही. भारतीयांच्या याच सवयींवरचा रिपोर्ट समोर आला आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आलीये.
पीपल फॉर रिसर्च ऑन इंडियास कन्झ्युमर इकॉनॉमीच्या (प्राईज) रिपोर्टनुसार देशातील ९० कोटींपेक्षा अधिक म्हणजे ६० टक्के लोकांचं उत्पन्न कमी आहे. तर दुसरीकडे त्यांचा खर्च मात्र अधिक आहे. अशामुळे त्यांना उपचारासाठीदेखील कर्ज घ्यावं लागतं. यामुळे त्यांना गरजेच्या वस्तू खरेदी करता येत नसल्याचं अहवालात म्हटलंय.
२५ राज्यांमधील ४० हजार कुटुंबीयांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता. यामध्ये त्यांना त्यांचं उत्पन्न आणि खर्चाच्या बाबतीत विचारणा करण्यात आली. रिपोर्टनुसार देशात वार्षिक ५ लाख ते ३० लाखांपर्यंत कमावणाऱ्या ४३ कोटी मध्यमवर्गीयांचं सर्व प्रकारचे कर भरुन खर्च करण्याइतकं उत्पन्न सरासरी ९.२५ लाख आहे. परंतु बचत मात्र १४ टक्के आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च अधिक
तर ३० लाखांपेक्षा अधिक कमावणाऱ्या ५.६ कोटी लोकांचं सरासरी खर्च करण्याईतकं उत्पन्न ३५.७७ लाख आहे. ते जवळपास ५७ टक्के रक्कम आवश्यक गोष्टींवर खर्च करतात. त्यांची बचतही १७ टक्के आहे. त्यांची बचत मध्यमवर्गीयांपेक्षा ३ टक्क्यांनी अधिक आहे. दुसरीकडे ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या ९३कोची लोकांच्या गरजा या त्यांना उत्पन्नापेक्षा अधिक आहेत. त्यांना रुग्णालयातील उपचाराच्या खर्चासाठीही कर्ज घ्यावं लागतं. रिपोर्टनुसार भारतात तेजीनं मध्यमवर्गीयांमध्ये वाढ होत आहे. याशिवाय त्यांची खर्च करण्याची क्षमताही वाढली आहे.