मॉस्को : डॉलरच्या विनिमय दरात चढ-उतारामुळे निर्माण होणाऱ्या स्थितीत एकमेकांना मदत करता यावी म्हणून १०० अब्ज डॉलरच्या ब्रिक्स परकीय चलन गंगाजळीत भारत १८ अब्ज डॉलरचे योगदान देणार आहे.ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी मिळून १०० अब्ज डॉलरचा परकीय चलन निधी स्थापन करण्याचा निर्णय घेतला यात चीन ४१ अब्ज डॉलरचे सर्वाधिक योगदान देणार आहे.भारताएवढेच योगदान ब्राझील आणि रशिया देणार असून, दक्षिण आफ्रिकेचे ५ अब्ज डॉलरचे योगदान असेल.रशियाच्या केंद्रीय बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या केंद्रीय बँकांनी ७ जुलै २०१५ रोजी मॉस्को येथे यासंदर्भात एक समझौता केला आहे. ब्रिक्स सदस्य देशांदरम्यानच्या परस्पर समर्थनासंदर्भातील अटींचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. हा निधी विम्यासारखाच असेल. एखाद्या सदस्य देशांत आयात-निर्यात ताळेबंदात असमतोल निर्माण झाल्यास, त्या देशास या निधीतून रक्कम काढता येईल. ब्रिक्स विदेशी चलन गंगाजळी निधी ३० जुलैपासून कार्यान्वित होणार आहे. ब्रिक्स निधी स्थापन करण्यासाठी १५ जुलै २०१४ रोजी ब्राझीलमधील फोर्तालिजा येथे करार करण्यात आला होता. ब्रिक्स देशांचे वित्तमंत्री आणि केंद्रीय बँक प्रमुखांच्या बैठकीनंतर मॉस्कोत हा करार स्वाक्षरित करण्यात आला. या निधीमुळे ब्रिक्स सदस्य देशांना डॉलरच्या विनिमय दरातील चढ-उताराच्या स्थितीत एकमेकांना वित्तीय स्थिरता राखण्यात मदत होईल.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार २६ जून रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय गंगाजळीत ३५५.२२१ अब्ज डॉलर उरले आहेत. उफा येथील ब्रिक्स देशांच्या दोन दिवसांच्या परिषदेत विमा निधीबाबत समझौता झाला. ----------------------ब्रिक्स बँकेद्वारे स्थानिक चलनात कर्जसुविधा देण्याच्या शक्यतेवरही या परिषदेत विचार केला जाऊ शकतो. के.व्ही. कामत हे ब्रिक्स बँकेचे पहिले प्रमुख असतील.
ब्रिक्स परकीय गंगाजळीत भारताचे १८ अब्ज डॉलर
By admin | Published: July 08, 2015 11:21 PM