Join us  

चीनला भारताचा दणका; मोबाइल निर्यातीत ४० % वाढ, पुरवठा साखळीत स्थान मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 7:23 AM

चीनमधील मोबाईल उत्पादनांच्या पुरवठा साखळीचा मोठा भाग आता भारतातकडे वळल्याचे या आकडेवारीतून दिसत आहे.

नवी दिल्ली - मोबाईल फोन निर्यातीच्या बाबतीत भारताची स्थिती जगात आणखी मजबूत झाली आहे. मेड इन इंडिया स्मार्टफोन जगभरात धुमाकूळ घालत आहेत. भारताच्या वाढलेल्या निर्यातीचा फटका चीन आणि व्हिएतनाम या बड्या निर्यातदार देशांना बसला आहे. 

जागतिक व्यापार डेटाचा हवाला देत अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील वर्षाच्या तुलनेत २०२४ च्या आर्थिक वर्षात चीन आणि व्हिएतनाममधून मोबाईल निर्यात अनुक्रमे २.७८% आणि १७.६% ने कमी झाली आहे. मात्र याच काळात भारतातून होणारी फोनची निर्यात ४०.५% वाढली आहे. चीन आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांच्या निर्यातीत घट झालेली असताना यातील जवळपास ५० टक्के घट भारताने भरून काढली आहे. चीनमधील मोबाईल उत्पादनांच्या पुरवठा साखळीचा मोठा भाग आता भारतातकडे वळल्याचे या आकडेवारीतून दिसत आहे.

‘पीएलआय’चा लाभ ॲपल आणि सॅमसंगलाही

ॲपलने या योजनेअंतर्गत देशात आयफोन उत्पादन सुरू केले. फॉक्सकॉन, पेगट्रॉन आणि विस्ट्रॉन या तीन प्रमुख त्यांचे प्लँट भारतात सुरू केले.  ॲपलने गेल्या दोन वर्षांत भारतातून उत्पादन आणि निर्यात दुप्पट केली आहे. भारताच्या मोबाईल निर्यातीत ॲपलचा वाटा ६५% आहे तर इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत वाटा एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे. सॅमसंगसारखी कंपनीसुद्धा पीएलआय योजनेची लाभार्थी हे. कंपनी आगामी काळात भारतातून मोठ्या प्रमाणात मोबाईलची निर्यात सुरू करणार आहे.

भारताची रणनीती यशस्वी

चीनकडून पुरवठा साखळीचा मोठा भाग आपल्याकडे खेचण्यासाठी भारत सरकारने स्मार्टफोनसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजना जाहीर केली. भू-राजकीय स्थिती आणि चीनसोबतच्या तणावामुळे कंपन्या चायना प्लस १ च्या रणनीतीवर काम करत आहेत. मोदी सरकार यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :भारतचीनमोबाइल