वॉशिंग्टन : भारताचा आर्थिक वृद्धिदर अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, वित्त वर्ष २०१९-२०च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपीचा वृद्धिदर ५ टक्क्यांवर घसरला असून, हा सहा वर्षांतील नीचांक ठरला आहे.
नाणेनिधीने जुलैमध्ये दिलेल्या अंदाजात २०१९ व २०२० या वर्षांत भारताचा वृद्धिदर कमी होऊन अनुक्रमे ७ टक्के आणि ७.२ टक्के राहील, असे म्हटले होते. वृद्धिदर घसरला असला, तरी तो मोठ्या उगवत्या अर्थव्यवस्थांत अजूनही सर्वाधिक आहे. चीनपेक्षा तर तो कितीतरी अधिक आहे, असे नाणेनिधीने म्हटले आहे.
नाणेनिधीचे प्रवक्ते गेरी राईस म्हणाले की, नवी आकडेवारी अजून येत आहे, पण अलीकडील भारताचा वृद्धिदर अपेक्षापेक्षा खूपच कमी राहिला. औद्योगिक व पर्यावरणविषयक नियामकीय अनिश्चिता आणि काही बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांतील कमजोरीचा हा परिणाम आहे. वृद्धिदर अंदाजासाठी जोखीम घसरगुंडीच्या दिशेने झुकली आहे. भारतातील जीडीपीचे आकडे अपेक्षेप्रमाणे नाहीत. आम्ही आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवून आहोत. येणाऱ्या जागतिक आर्थिक अंदाजात आम्ही आमचा आढावा अद्ययावत करू.