UAE Investment in India : भारताच्या अर्थव्यवस्थेने वेग पकडला आहे. आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत भारताचे नाव घेतले जाते. सर्व जागतिक संस्थांसोबतच मोठ्या देशांनीही भारताचे कौतुक केले आहे. दरम्यान, भारताचा आर्थिक वेग पाहून संयुक्त अरब अमिराती (UAE)ने भारतात मोठ्या गुंतवणुकीची योजना आखली आहे. ही गुंतवणूक 50 अब्ज डॉलर्सची असेल.
भारत-यूएई संबंध दृढ होताहेतब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, संयुक्त अरब अमिराती (UAE) भारतात 50 अब्ज डॉलरपर्यंतची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. अलीकडच्या काळात यूएई आणि भारत, यांच्यातील संबंध खूप मजबूत झाले आहेत. यासोबतच दोन्ही देशांमधील व्यापारही सातत्याने वाढत आहे. आत्तापर्यंत UAE-भारत यांच्यातील इंधनाव्यतिरिक्त द्विपक्षीय व्यापार सुमारे $100 अब्जांपर्यंत पोहोचला आहे. आता या नात्याला पुढे नेण्याची तयारी म्हणून युएई भारतात 50 अब्ज डॉलर्स, म्हणजेच 4 लाख कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.
पुढील वर्षी घोषणा होणाररिपोर्ट्सनुसार, पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 2024 मध्ये UAE कडून या गुंतवणुकीबाबत मोठी घोषणा केली जाईल. UAE मधून येणार्या या गुंतवणुकीमुळे भारतातील ज्या क्षेत्रांना बळकटी मिळणार आहे, त्यात उत्पादन आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे. यामुळे विविध क्षेत्राला गती मिळून देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल.
चीनला मिर्ची लागणारभारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे आणि आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. जगभरातील गुंतवणूकदार भारताला गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम स्थान मानत आहेत. यामुळे चीनला चांगलीच मिर्ची लागणार आहे. एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था रॉकेटच्या वेगाने पुढे जात आहे, तर दुसरीकडे विविध कारणांमुळे चीनची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून चीनला आपली स्थिती सुधारता आलेली नाही. बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील सततच्या धक्क्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून सोडले आहे.