जगभरातील अनेक बड्या देशांच्या अर्थव्यवस्थेत सातत्याने घसरण दिसून येत आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था तर कोरोना काळापासून अद्यापही सावरलेली नाही. मात्र अशा जागतिक संकटाच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरू आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशाचा जीडीपी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 7.6 टक्के एवढा राहिला आहे. यासंदर्भात बोलताना, "देशाच्या जीडीपीमध्ये झालेली वाढ भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि मजबुती दर्शवते," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचे आकडे जागतिक स्तरावरील परीक्षेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि मजबुती दर्शवतात. सरकारी आकडेवारीनुसार, उत्पादन, खाणकाम आणि सेवा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे सप्टेंबर तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 7.6 टक्के राहिला आणि ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्थाही राहिली आहे.
यासंदर्भात पीएम मोदी यांनी "एक्स'वर म्हटले आहे, ‘दुसऱ्या तिमाहीतील GDP आकडे जागतिक स्तरावर अशा कठीण काळात भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि मजबुती दर्शवतात. आम्ही अधिकाधिक संधी निर्माण करण्यासाठी, गरिबीचे जलद निर्मूलन आणि आमच्या लोकांसाठी जीवनातील सुलभतेत सुधारणा करण्यासाठी तेजीने विकासासाठी कटिबद्ध आहोत."