Join us

भारताची अर्थव्यवस्था पाच वर्षांत वेगाने वाढेल

By admin | Published: February 11, 2017 1:42 AM

आगामी पाच वर्षांत भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज अमेरिकेतील एका संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे

वॉशिंगटन : आगामी पाच वर्षांत भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज अमेरिकेतील एका संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलने ‘ग्लोबल ट्रेंड्स’ या नावाचा एक अहवाल जारी केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, भारताच्या आर्थिक प्रगतीची बरोबरी करणे पाकिस्तानला कुठल्याही परिस्थितीत शक्य होणार नाही. त्यामुळे पाकिस्तान अन्य मार्गांचा वापर करील. अहवालात म्हटले आहे की, चीनची अर्थव्यवस्था शिथील होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षांत भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनेल. आर्थिक क्षेत्रात भारताची बरोबरी करणे शक्य नसल्यामुळे पाकिस्तान विविध देशांशी भागिदारी करण्याचा प्रयत्न करील. अण्वस्त्र साठ्यात वाढ करण्याचा प्रयत्न करील. प्रत्यक्ष युद्धभूमीवर वापरता येऊ शकणारे अणुबॉम्बचा साठा पाकिस्तानकडून वाढविला जाईल. भारताला रोखण्याचा हा पाकचा आपला मार्ग असेल, असे अहवालात म्हटले आहे. अहवालात पुढे म्हटले की, दहशतवादावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानला देशांतर्गत सुरक्षाविषयक धोक्यांचा सामना करावा लागेल. मोहिमांत वापरल्या जाणारे पाकिस्तानची उपकरणे हळहळू निकृष्ट होत जातील. आर्थिक स्रोतांतही घसरण होत जाईल. त्यात दहशतवादाचा निपटारा करण्याविषयीची चर्चाही हळहळू कमी होत जाईल. आगामी पाच वर्षांच्या काळात पाकिस्तानला हिंसक दहशतवादाचा फारसा धोका संभवणार नाही. तथापि, विभागीय सुरक्षेवर पाकिस्तानचा नकारात्मक परिणाम होईल. (वृत्तसंस्था)