स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली औषध निर्माता कंपनी सिप्ला विक्रीच्या उंबरठ्यावर आहे. या कंपनीच्या विक्रीबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, देशातील प्रमुख औषध निर्माता कंपनी असलेल्या सिप्लाच्या ब्लॅकस्टोनकडून होत असलेल्या अधिग्रहणाबाबत आपण दु:खी असले पाहिजे. ही कंपनी देशाच्या राजकीय आर्थिक आणि सामाजिक इतिहासाचा भाग राहिलेली आहे. एका बातमीचा हवाला देत रमेश पुढे म्हणाले की, जगातील सर्वात मोठा इक्विटी फंड ब्लॅक स्टोन सिप्लाच्या प्रमोटरची ३३.४७ टक्के भागीदारी मिळवण्यासाठी पुढच्या आठवड्यापर्यंत बोली लावण्याची शक्यता आहे.
सिप्ला कंपनीची स्थापना १९३५ मध्ये ख्वाजा अब्दुल हामिद यांनी केली होती. ख्वाजा अब्दुल हामिद यांच्यावर महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद यांचा प्रभाव होता. त्यांनी सीएसआयआरच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
जयराम रमेश पुढे म्हणाले की, सिप्ला लवकरच भारतीय राष्ट्रवादाचं झळाळतं उदारहण म्हणून समोर आलं. त्यांचे पुत्र युसुफ हमिद यांनी सिप्ला कंपनीला कमी खर्च असणाऱ्या जेनेरिक औषधांचा जगभरातील पुरवठादार बनवले. याच कंपनीने अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटिश मक्तेदारी आणि पेटंटधारकांना यशस्वीरीत्या आव्हान दिले. युसुफ हामिद यांनी इतर अनेक भारतीय कंपन्यांना वेगवेगळ्या देशांमध्ये स्वत:ला स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला.
सिप्ला ही भारताच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. तसेच ब्लॅकस्टोनकडून त्याच्या होत असलेल्या अधिग्रहणामुळे सर्वांना दु:ख व्हायला पाहिजे, असेही जयराम रमेश म्हणाले.