Join us  

IRFC Listing: पहिल्याच IPO नं केलं निराश; पाहा कितीवर झाला शेअर लिस्ट

By जयदीप दाभोळकर | Published: January 29, 2021 11:41 AM

वाचा काय आहे शेअर निराश करण्यामागंच कारण

ठळक मुद्देIRFC च्या ३.४९ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. ४,६३३ कोटी रूपयांचा हा आयपीओ होता.

२०२१ या वर्षाच्या पहिल्याच आयपीओनं गुंतवणूकदारांना निराश केलं आहे. इंडियन रेल्वे फायनॅन्शिअल कॉर्पोरेशन (IRFC) चा शेअर आज शेअर बाजारात लिस्ट झाला. बीएसईवर हा शेअर आपल्या इश्यू प्राईजपेक्षाही कमी म्हणजेच २५ रूपयांवर लिस्ट झाला. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना जवळपास ३.८५ टक्क्यांचं नुकसान झालं. तर दुसरीकडे एनएसईवर हा शेअर १.१० रुपयांनी कमी म्हणजेच २४.९० रूपयांवर लिस्ट झाला. एनएसईवर गुंतवणूकदारांना ४.२३ टक्क्यांचं नुकसान झालं.इंडियन रेल्वे फायनॅन्शिअल कॉर्पोरेशनला (IRFC) ३.४९ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. हा वर्षाचा पहिला आयपीओदेखील होता. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला होता. इंडियन रेल्वे फायनॅन्शिअल कॉर्पोरेशनचा ४,६३३ कोटी रूपयांचा आयपीओ १८ जानेवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला होता आणि २० जानेवारी याची अंतिम तारीख होती. या आयपीओअंतर्गत कंपनीला ४,३५,२२,५७,२२५ शेअर्ससाठी बिड्स मिळाल्या होत्या. परंतु कंपनीचे केवळ १,२४,७५,०५,९९३ शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध होते. आयआरएफसी भारतीय रेल्वेची सहाय्यक कंपनी म्हणून काम करते. ही कंपनी देशांतर्गत आणि विदेशातील बाजारांतून फंड्स एकत्र करण्याचं काम करते. या आयपीओनंतर कंपनीमध्ये सरकारचा हिस्सा १०० टक्क्यांवरून ८६.४ टक्क्यांवर आला आहे. का केलं शेअरनं नाराज?शेअर बाजारात सलग पाच दिवस घसरण दिसत असल्यानं ग्रे मार्केटमध्ये आयआरएफसीच्या शेअर्सच्या किंमतीची चमक कमी झाल्याचं दिसत होतं. यामुळेच आज या शेअर्सचं लिस्टींग कमी दरात झालं. जेव्हा इश्यू घोषित करण्यात आला त्यावेळी ग्रे मार्केटमध्ये शेअर १.५ रूपयांच्या प्रिमिअमवर सुरू होता. परंतु शेअर बाजारात घसरण झाली आणि गुरूवारी हा प्रिमिअम कमी होऊन २० ते २५ पैसे झाला. अनलिस्टेड मार्केच्या डिलर्सनं यासाठी शेअर बाजाराची धारणा आणि अर्थसंकल्पापूर्वीची अनिश्चितता जबाबदार असल्याचं म्हटलं.

टॅग्स :शेअर बाजारव्यवसायभारतीय रेल्वे